National Youth Day 2021: स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून का साजरा केला जातो?
त्यांच्या शिकवणीमधून आजच्या तरूण पिढीला त्यांच्या आयुष्यात एक दिशा मिळू शकते या प्रेरणेमधून त्यांची जयंती ही तरूणाईला समर्पित करण्यात आली आहे.
जानेवारी 12 हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती(Swami Vivekananda Jayanti). भारतासोबतच पाश्चिमात्य देशात हिंदू धर्माचा प्रसार करणारे, श्री रामकृष्ण परमहंस (Sri Ramakrishna Paramahansa) यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारतात युथ डे (National Youth Day) म्हणून देखील साजरा केला जातो. भारताच्या जडघडणीमधील त्यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ 1984 पासून विवेकानंद यांची जयंती नॅशनल युथ डे/ युवक दिन म्हणून भारतामध्ये साजरा होण्यास सुरूवात झाली. Swami Vivekananda Jayanti: स्वामी विवेकानंद जयंती निमित्त त्यांचे 'हे' विचार एकदा नक्की वाचा; आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारत्मक करण्यात होईल मदत.
स्वामी विवेकानंद यांचे विचार हे पुरोगामी आणि प्रेरणादायी होते. त्यांच्या शिकवणीमधून आजच्या तरूण पिढीला त्यांच्या आयुष्यात एक दिशा मिळू शकते या प्रेरणेमधून त्यांची जयंती ही तरूणाईला समर्पित करण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद यांचे 1893 मधील अमेरिकेच्या शिकागो मधील भाषण विशेष गाजले. तरूण पिढी हे देशाचं भवितव्य असल्याने त्यांच्यामध्ये रॅशनल थिंकिंग म्हणजेच तर्कसंगत विचार करण्याची वृत्ती निर्माण व्हावी हे या नॅशनल युथ डे म्हणजेच युवा दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे प्रत्येक तरूण-तरूणीने त्यांच्यामधील इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःमध्ये दडलेल्या गुण-अवगुणांना चालना देऊन योग्य त्या गोष्टींसाठी प्रसंगी झटून ध्येयप्राप्ती करावी अशी अपेक्षा आहे. विद्यार्थी दशेपासूनच तरूणाईने स्वतःचं ध्येय ओळखवावं यासाठी शाळा,कॉलेज मध्ये यानिमित्ताने खास स्पर्धांचं आयोजन केले जाते.
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना करून जगभरात त्यांच्या संस्था सुरू करून हिंदू धर्माचा प्रचार करण्यास सुरूवात केली. राजा अजितसिंग खेत्री यांनी 10 मे 1893 ला त्यांना 'विवेकानंद' असे नाव दिले असे सांगितले जाते. त्यांचे मूळ नाव नरेंद्र होते. बंगालमध्ये वडील विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. विवेकानंद लहानपणापासूनच प्रतिभावान होते. 4 जुलै 1902 दिवशी त्यांनी कोलकत्ता मध्ये बेलूर मठात समाधी घेतली.