National Reading Day: मराठीतील ही पाच पुस्तके तुम्ही वाचली आहेत का?

अर्थात कोणतेच पुस्तक कधीच वाईट नसते. परंतू, वेळ आणि शब्दमर्यादा ध्यानात घेऊन त्यातील काहींची निवड करावी लागते. त्यामुळे मराठी वाचकांना आम्ही इथे पाच पुस्तके सूचवित आहोत.

National Reading Day 2020 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशभरात आज राष्ट्रीय वाचन दिन (National Reading Day) साजरा केला जात आहे. प्रतिवर्षीच 19 जून हा दिवस नॅशनल रीडिंग डे म्हणून साजरा केला जातो. नॅशनल रीडिंग डे साजरा करण्याचे यंदा 25 वे वर्ष आहे. केरळ राज्यातील ग्रंथालय चळवळ चळवळ मोठ्या जोमाने चालवणाऱ्या दिवंगत पी एन पनिकर (P. N. Panicker) यांच्या सन्मार्थ 19 जून हा दिवस राष्ट्रीय वाचन दिन (National Reading Day 2020) म्हणून साजरा केला जातो. देशभरातील विविध शाळा, महाविध्यालयंत, ग्रंथालयं आणि वाचकप्रेमी हा दिवस साजरा करतात. मात्र, कोरना व्हायरस संकटामुळे यंदा विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन एकत्र न येता घरीच थांबून हा दिन साजरा करण्याचे अवाहन केले जात आहे. अशा या खास दिवशी मराठी वाचकाने ही खास पुस्तके वाचायलाच हवीत. अर्थात कोणतेच पुस्तक कधीच वाईट नसते. परंतू, वेळ आणि शब्दमर्यादा ध्यानात घेऊन त्यातील काहींची निवड करावी लागते. त्यामुळे मराठी वाचकांना आम्ही इथे पाच पुस्तके सूचवित आहोत.

सत्तांतर- व्यंकटेश माडगूळकर

'सत्तांतर' हे नाव वाचून अनेकांना हे पुस्तक राजकारणाशी संबंधीत आहे असे वाटू शकेल. काही प्रमाणत ते खरेही आहे. पण पूर्णपणे खरे नाही. व्यंकटेश माडगूळकर लिखीत सत्तांतर हे पुस्तक खरं तर माकडांच्या आयुष्यावर आधारीत आहे. माकड हा मानवाचा पूर्वज मानला जातो. त्यामुळे मानवी स्वभावाचे, वर्तनाचे विविध पैलू त्यात आढळले नाही तरच नवल. त्यामुळे या पुस्तकातील कथानक माकडांचे असले तरी मानवी जीवनातील विविध पैलू आपल्याला पानापानांतील प्रत्येक वाक्य आणि शब्दागणिक दिसतात. माकडाचा जन्म, संघर्ष, सत्ता, सत्ताकारण आणि एकूणच सहसंबंध असे या पुस्तकातील कथानकाचे सूत्र. पण लेखकाने या पुस्तकाच्या रुपात अखंड मानवी व्यवहार गुंपला आहे. जो वाचनीय आहे.

रॉ - भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा- रवि आमले

पत्रकार, लेखक रवि आमले यांनी लिहिलेलं 'रॉ - भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा' हे एक अत्यंत सुंदर पुस्तक. भारतीय राजकारण, भारताचे परराष्ट्र धोरण, मित्रराष्ट्रांमध्ये असलेले भारताचे स्थान, भारताचे शेजारी यांच्याशी भारताचे असलेले पडद्यावरचे आणि पडद्यामागचे संबंध. त्या संबंधात भारताचे वजन. अमेरिका, रशिया, चीन, इग्लंड या देशांना दिलेला शह-काटशह. दहशतवाद. पाकिस्तानशी संबंध आणि कटुता. भारतात वावरणाऱ्या विदेशी शक्ती. त्याला भारताने घातलेली वेसण. त्यासाठी मोजलेली शक्ती. केलेला खर्च. त्यातून हाती आलेले यश. पदरी पडलेले अपयश. या सगळ्यांचा धांडोळा म्हणजे हे पुस्तक. (हेही वाचा, World Book Day 2020: Lockdown असो की 'एकांत', प्रत्येक वेळी नवा अनुभव देणारा मित्र 'पुस्तक')

विषयांतर- चंद्रकांत खोत

चंद्रकांत खोत हे प्रसिद्ध पण अनेकांना माहित नसलेलं नाव. अगदी वाचनाचा छंद असलेल्या अनेकांना. जो मुरब्बी वाचक आहे. ज्याला साहित्याची जाण आहे. किंवा जो एखादा व्यक्ती मराठी साहित्यातील लैंगिकतेवर भाष्य करणारी पुस्तके आवर्जून वाचतो अशांना चंद्रकांत खोत हे नाव नक्कीच माहिती असते. अलिकडेच त्यांचे निधन झाले. 'उभ्यान्वयी अव्यय ', 'बिनधास्त', ' विषयांतर' ही त्याची काही स्पोटक नावे. त्यांची सर्वच पुस्तके जबराट आहेत. मात्र इथे 'विषयांतर' सूचवत आहोत. खोतांचे एक पुस्तक वाचले की बाकिची पुस्तके वाचण्याचा मोह आपोआप होतो. इथे 'विषयांतर' पुस्तकाबाबत मुद्दामच विस्ताराने देत नाही आहोत. आपली उत्सुकता वाढावी आणि पुस्तक वाचावे म्हणून.

मुंबई दिनांक- अरुण साधू

'मुंबई दिनांक' हे पत्रकार आणि व्यासंगी लेखक अरुण साधू यांचे पुस्तक. पुस्तक कसले शहरी जीवन आणि हरवलेलेल जगणे याचा पटच तो. साधारण आणिबाणीनंतरचा काळ, त्यातून जन्माला आलेले राजकारण,समाजकारण, दुसऱ्या महायुद्धाचे दिसत असलेले परीणाम. त्याचा मानवी जिवनावर होत असलेला परिणाम. राजकारणासाठी त्याचा होत असलेला वापर. छोट्या मोठ्या घटनांनी ढवळून निघणारे राजकार. ज्यात विचारी मानसांची होणारी कुचंबना, भ्रमनिरास यांसारख्या अनेक गोष्टींचे दर्शन मुंबई दिनांक कादंबरीतून होते. मुंबई दिनांक या पुस्तकाप्रमाणेच अरुण साधू यांची सिंहासन ही कादंबरीही महत्त्वाची आहे. या दोन पुस्तकांमुळे साधू यांना राजकीय कादंबरीकार म्हणून ओळकले जाऊ लागले. दरम्यान, सध्या चीन आणि भारत यांचा संघर्ष सुरु आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही साधू यांची ड्रागन जागा झाला आणि ड्रॅगन जागा झाल्यावर अशी दोन पुस्तके नक्की वाचा.

आरएसएस- जयदेव डोळे

जयदेव डोळे लिखित आरएसएस हे पुस्तक तुम्हाला तुमच्यातील चिकित्सेला चालना देते. आपण एखाद्या विचारसरणीचे असो किंवा नसो. एखाद्या विचारसणीला आपण पाठिंबा देणारे असू किंवा नसू. एखाद्या गोष्टीकडे चिकित्सकपणे कसे पाहवे याचे दर्शन या पुस्तकातून घडते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थातच आरएसएस ही भारतातील एक मोठी संघटना मानली जाते. या संघटनेबाबत अनेकांना उत्सुकता असते. काहींना आक्षेप असतो. या संघटनेच्या विचारसरणी आणि एकून कार्यक्रमावर डोळे यांनी परखड लिहिले आहे.

दरम्यान, नॅशनल रीडिंग डे ज्यांच्यामुळे साजरा केला जातो त्या पी एन पनिकर यांचा जन्म 1 मार्च 1909 या दिवशी झाला. त्यांचे वडील गोविंद पिल्लई आणि आई जानकी अम्मा यांच्या पोटी नीलमपूर येथे ते जन्माला आले. त्यांना केरळमध्ये चालवण्यात आलेल्या ग्रंथालय चळवळीचे जनक मानले जाते. पनिकर यांनी 1926 मध्ये आपल्या गावात सनातनधर्म ग्रंथालयाची उभारणी केली. पनिकर एक शिक्षक होते. 19 जून या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त नॅशनल रीडिग डे साजरा केला जातो.