IPL Auction 2025 Live

Margashirsha Guruvar Vrat Puja Vidhi: 9 डिसेंबरला यंदा पहिला मार्गशीर्ष गुरूवार; जाणून घ्या या व्रतासाठी घटमांडणी, पूजा कशी कराल?

मार्गशीर्ष गुरूवार व्रतामध्ये पहिला गुरूवार 9 डिसेंबर दिवशी आहे तर शेवटचा गुरूवार 30 डिसेंबर दिवशी आहे.

Margashirsha Guruvar | File Image

Margashirsha Guruvar Vrat Puja Vidhi: हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या खास असलेला एक मराठी महिना म्हणजे मार्गशीर्ष (Margashirsha). यंदा 5 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात झाली आहे. या महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत (Mahalaxmi Guruvar Vrat) करण्याची प्रथा आहे. यावर्षी पहिला गुरूवार 9 डिसेंबर दिवशी आहे. या दिवसाच्या निमित्ताने काही घरांमध्ये घटाच्या रूपात लक्ष्मीची मांडणी करून पूजा करण्याची रीत आहे. मग यंदा तुम्ही देखील दर गुरूवारी महालक्ष्मी पूजनासाठी घटमांडणी करणार असाल तर जाणून घ्या या मार्गशीर्ष गुरूवार व्रतासाठी घट कसा मांडतात. पूजा विधी काय आहेत?

दरम्यान मार्गशीर्ष गुरूवार व्रतामध्ये पहिला गुरूवार 9 डिसेंबर दिवशी आहे तर शेवटचा गुरूवार 30 डिसेंबर दिवशी आहे. या व्रतामध्ये वैभव लक्ष्मी व्रतकथेचे पठण करतात. सवाष्ण स्त्रिया हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. Margashirsha Guruvar Vrat 2021 Dates: 5 डिसेंबर पासून मार्गशीर्ष मासारंभ; पहा यंदा गुरूवार व्रताच्या तारखा काय? 

मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा विधी व घट मांडणी

घरातील पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा. चौरंगावर नवीन कापड अंथरावे. कापडावर गहू वा तांदूळ यांची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. पाटावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वा पाटावर ठेवावी. मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा.

घट मांडल्यावर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी. त्यानंतर आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला गोडाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर भोजन करावे. यादिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. दुध आणि फळांचे सेवन करावे, या दिवसात घरात मांसाहार करू नये. दुसऱ्या दिवशी या कलशातील विडा, फुले आणि विड्याची पाने विसर्जित करावी. तर कलशातील पाणी तुळशीला घालावे. दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी सवाष्णींना हळदीकुंकू, फळे देऊन इतर वाण लुटले जाते. Margashirsha Guruvar Ragoli 2021: मार्गशीष गुरुवार निमित्त खास सोप्प्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video).

मार्गशीर्ष गुरुवार व्रत नियम

दरम्यान मार्गशीर्ष गुरूवार  या व्रताचे जो पालन करतो त्यांच्या संसारात महालक्ष्मीचा वरदहस्त टिकून राहतो. परिणामी धनधान्य, समृद्धी यांची वृद्धी होत राहते.

(टीप- या लेखाचा उद्देश माहिती देणे हा आहे,  लेटेस्टली मराठी कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही तसेच अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही)