Mangalagaur Ukhane: श्रावणातल्या पूजेसाठी आणि खेळांसाठी खास मराठमोळे उखाणे; नववधूंसाठी लोकप्रिय शब्दांची मेजवानी

श्रावण महिन्यातील मंगळागौरीच्या पूजेदरम्यान आणि रात्रीच्या खेळांमध्ये नवविवाहित महिलांसाठी उखाणा घेणे हा विशेष आकर्षणाचा भाग असतो. या सणानिमित्त सहज, सोपे आणि लक्षात राहणारे काही निवडक पारंपरिक व आधुनिक मंगळागौर उखाणे.

श्रावण महिन्यात साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये मंगळागौरीच्या व्रताला महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेष स्थान आहे. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये नववधू हे व्रत भक्तिभावाने आणि उत्साहाने करतात. मंगळागौरीच्या दिवशी षोडशोपचार पूजा, आरती आणि रात्रीच्या पारंपरिक खेळांच्या वेळी पतीचे नाव उखाण्यात गुंफण्याची प्रथा अत्यंत लोकप्रिय आहे. सासर-माहेरच्या मंडळींमध्ये रंगणाऱ्या या उत्सवात नववधूचा उखाणा कौतुकाचा विषय ठरतो.

मंगळागौरीच्या पूजेच्या वेळेस घेता येणारे उखाणे

पूजेच्या वेळी किंवा आरती संपल्यानंतर शांत आणि धार्मिक वातावरणाला साजेसे उखाणे घेण्याची परंपरा आहे.

सूर्यबिंबाचा कुमकुमतिलक, पृथ्वीच्या भाळी.

...रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी.

मंगळागौरीच्या पूजेला केली फुलांची आरास.

...राव लावत आहेत आम्रपर्णांचे तोरण दारास.

सात हंड्यांवर ठेवली कळशी.

...रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी.

मंगळागौरी माते, नमन करते तुला.

...रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला.

संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा.

...रावांचे नाव घेऊन, आशीर्वाद मागते सौभाग्याचा.

खेळ आणि जागराच्या वेळचे मजेशीर उखाणे

मंगळागौरीच्या रात्री 'झिम्मा', 'फुगडी', 'पिंगा' यांसारखे पारंपरिक खेळ खेळताना महिला एकमेकींची थट्टामस्करी करतात. अशा वेळी हलकेफुलके आणि यमक जुळणारे उखाणे अधिक रंगत आणतात.

लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव, बदलावा लागतो स्वभाव.

...च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव, मात्र मंगळागौरीच्या दिवशी खाते थोडा भाव.

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात.

...रावांचे नाव घेते, आता तरी सोडा माझी वाट.

मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी मोडली घडी नव्या साडीची.

...रावांनी दिली भेट मला नव्या गाडीची.

श्रावणातल्या मंगळागौरीला सर्वांचा मान राखून घेते मी उखाणा.

...रावांचे नाव घ्यायला करत नाही मी कसलाही बहाणा.

सीतेची पवित्रता, पार्वतीचा निग्रह.

मंगळागौरीच्या दिवशी ...रावांचे नाव घेण्यास करू नका आग्रह.

निसर्ग आणि श्रावण ऋतूवर आधारित उखाणे

श्रावणातील निसर्गरम्य वातावरण आणि पावसाच्या सरींचा उल्लेख असलेले उखाणे मंगळागौरीच्या सणात अधिक खुलून दिसतात.

भर श्रावणात पाऊस आला जोरात.

...रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी ...च्या घरात.

मेघमल्हार बहरताच, श्रावणसर कोसळते.

...रावांचे नाव घेऊन मंगळागौरीची पूजा करते.

श्रावणात बरसतात सरींवर सरी.

मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी ...रावांची सखी मी बावरी.

आंब्याच्या वनराईमध्ये कोकिळेचे गुंजन.

...रावांचे नाव घेते आणि करते मंगळागौरीचे पूजन.

उखाण्यांचे सांस्कृतिक महत्त्व

महाराष्ट्रातील पारंपरिक सणांमध्ये उखाणे केवळ एक औपचारिकता नसून ते नात्यांमधील संवाद, आदर आणि आपुलकी वाढवण्याचे प्रभावी माध्यम आहेत. मंगळागौरीच्या निमित्ताने नवविवाहित तरुणींना आपल्या भावना मोकळेपणाने मांडण्याची आणि कुटुंबातील सर्व सदस्यांशी नाते अधिक घट्ट करण्याची उत्तम संधी या परंपरेतून मिळते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement