Mahashivratri 2021: जाणून घ्या नक्की कशी करावी महाशिवरात्री पूजा; भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी 'या' गोष्टींचे पालन करा
त्यावेळी शिवाने हा विष प्राशन करून ब्रम्हांडाचे रक्षण केले. मात्र विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपुर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला.
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे (Mahashivratri 2021) पर्व मोठ्या भक्तिभावाने साजरा केले जाते. माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र साजरी होते. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो व शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात. या दिवशीच्या उपवासाला विशेष महत्व आहे. अध्यात्मिक साधकांसाठी शिवरात्र म्हणजे नूतन वर्षारंभ असतो. या रात्री-सर्व ग्रहांची स्थिती ध्यानासाठी उत्तम अशी असते. म्हणून शिवरात्रीला जागरण करणे आणि ध्यान करणे खूपच लाभदायक असते. यंदा गुरुवार, 11 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे.
जीवनातील दुःख, अडचणी, पाप, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महाशिवरात्री दिवशी महादेवाची भक्तिभावाने उपासना केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवसाचा प्रारंभ शिवयोगात होतो आहे जो शंकराच्या पूजेसाठी शुभ मानला जातो. मात्र ही पूजा सिद्धीस जाण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे महत्वाचे आहे. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही सांगत आहोत, महाशिवरात्रीला काय करावे व काय करू नये.
काय करावे -
- महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा होते.
- पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात.
- त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात.
- शिवरात्रीचा उपवास सकाळी सुरु होऊन तो दुसऱ्या दिवशी संपतो. (हेही वाचा: Maha Shivratri 2021 Date: मार्च महिन्यात 'या' तारखेला आहे महाशिवरात्री, शिवभक्तांनी आर्वजून कराव्या काही महत्त्वाच्या गोष्टी)
हे करू नये –
- महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला चुकूनही तुळस वाहू नये. तुळशीचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पण, तुळस भगवान शंकराला वर्ज्य आहे.
- महाशिवरात्रीच्या दिवशी शिव उपासनेत शंख वाजवणे निषिद्ध मानले आहे.
- शिवरात्रीला गहू, भात आणि डाळीपासून तयार झालेले पदार्थ खाऊ नये. उपवास केला असेल तर फळे, दूध, चहा, कॉफी यांचे सेवन करावे.
- शिवलिंगावर कुंकवाचा टिळा लावू नये तसेच तुटलेल्या अक्षता वाहू नये.
- शिवपिंडीला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालावी.
- या दिवशी भांडण-तंटा करू नये किंवा मद्य, मांसाहार यांचे सेवन करू नये.
दरम्यान, ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी त्यातून हलाहल विष देखील बाहेर आले. त्यावेळी शिवाने हा विष प्राशन करून ब्रम्हांडाचे रक्षण केले. मात्र विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपुर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला. त्यावेळी सर्व देवांनी महादेवाला बरे वाटावे म्हणुन रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. यामुळेच सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते असा समज आहे.