लालबागचा राजा 2018 : 'असा' दिला लालबागच्या राजाला अखेरचा निरोप
गिरगाव चौपाटीपासून आत एका विशेष बोटीच्या मदतीने खोल समुद्रात केलं जातं लालबागच्या राजाचं विसर्जन
मुंबई : सुमारे 20-22 तासांच्या मिरवणूकीनंतर लालबागच्या राजाचं सोमवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर आगमन झालं. लालबागच्या राजाला गिरगाव चौपाटीच्या किनार्यावरून एका ल्हास बोटीने समुद्रामध्ये नेले जाते. त्यानंतर कोळी बांधव लालबागच्या राजाचं विसर्जन करतात.
यंदा डॉल्बी, डीजेला फाटा देत पारंपारिक वाद्य, ढोल-ताशे आदींच्या गजरात अनेक सार्वजनिक मंडळाच्या मिरवणूकी निघाल्या होत्या. त्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळाच्या गणपतींचे विसर्जन वेळेत झाले.
यंदा 85 वे वर्ष
लालबागचा राजा मंडळ हे मुंबईतील लोकप्रिय सार्वजनिक मंडळ आहे. या मंडळाने यंदा 85 वा सार्वजनिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. दरम्यान यंदाच्या वर्षी ऐन मंडपात मुंबई पोलिस आणि मंडळ कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेली बाचाबाची, लालबागच्या राजाच्या गर्दीमध्ये अनेकांचे मारले गेलेले मोबाईल फोन्स यामुळे यंदाही लालबागचा राजा मंडळ आणि वाद हे समीकरण दिसून आले.
धर्मदाय आयुक्तांकडे प्रकरण
लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई पोलिसांशी घातलेली हुज्जत सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे. यानंतर हे प्रकरण आता धर्मदाय मंडळाकडे आहे. या प्रकरणी धर्मदाय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.