लालबागच्या राजाच्या मुखदर्शन आणि चरणस्पर्शाची शेवटची संधी शनिवारपर्यंतच !
यंदा लालबागच्या राजाच्या मुखदर्शन आणि चरणस्पर्शाची रांग शनिवारी पहा कोणत्या वेळी थांबवण्यात येणार आहे.
मुंबई : लालबागचा राजा मंडळ हे मुंबईतील लोकप्रिय सार्वजनिक मंडळापैकी एक आहे. यंदा मंडळाने 85 वा सार्वजनिक गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला. लाखो भाविकांसाठी 24 तास दर्शनाला खुल्या असणार्या लालबागच्या राजाच्या दर्शनाची रांग शनिवार, 22 सप्टेंबर 2018 ला थांबवण्यात येणार आहे. लालबागच्या राजाला दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची तोबा गर्दी होती. ८५ वर्षातील लालबागच्या राजाचं बदलतं रूप पहा खास फोटो !
शनिवारी बंद होणार दर्शन
सार्वजनिक गणेशोत्सव दहा दिवसांचा असला तरीही भाविकांची अलोट गर्दी पाहता लालबागच्या राजाचं दर्शन 9व्या दिवशी बंद केलं जातं. त्यानुसार यंदा लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची रांग शनिवारी रात्री 12 वाजता तर चरणस्पर्शाची रांग सकाळी 6 वाजता बंद करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडून भाविकांना दर्शन देतो. त्यापुढे तब्बल 22-24 तासांनी लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन केलं जातं.
सामान्य नागरिकांसोबत सेलिब्रिटींनाही आकर्षण
लालबागच्या चिंचोळ्या गल्लीत लालबागच्या राजाची भव्य मूर्ती विराजमान होते. गणेशोत्सवात 24 तास लालबागचा राजा भाविकांना दर्शनासाठी खुला असतो. यंदाही सामान्य नागरिकांसोबत अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी, सचिन तेंडुलकर, अमित ठाकरे आदींनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
उत्सवाला वादाचं गालबोट
लालबागच्या राजाच्या मंडपात यंदा गर्दीचं नियोजन करताना मंडळ कार्यकर्ते आणि मुंबई पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. भर मंडपात कार्यकर्ते पोलिसांची वाद घालत उर्मेटपणे बोलत होते. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या हे प्रकरण धर्मेदाय आयुक्तांकडे असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.