Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करतात? जाणून घ्या यंदा पूजा विधी मुहूर्त
श्रीकृष्ण जन्माष्टमी, यंदा 4 सप्टेंबर 2026 रोजी साजरा होणाऱ्या या पावन पर्वाची अचूक तारीख, शुभ मुहूर्त, मध्यरात्रीची पूजा विधी आणि उपवास कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती घ्या जाणून!
भारतात श्रद्धा आणि उत्साहात साजरा होणाऱ्या प्रमुख सणांपैकी एक म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. हा दिवस भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा प्रतीक आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला हा सण साजरा केला जातो, आणि २०२६ मध्ये कृष्ण जन्माष्टमी शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. हा सण केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून, तो प्रेम, भक्ती आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देतो.
श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे काय?
श्रीकृष्ण जन्माष्टमी, ज्याला गोकुळाष्टमी किंवा श्री कृष्ण जयंती म्हणूनही ओळखले जाते, भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेत कंसाच्या कारागृहात देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी मध्यरात्री झाला होता. त्यांनी पृथ्वीवरील अत्याचार आणि अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली. म्हणूनच, त्यांचा जन्मदिवस अत्यंत पवित्र मानला जातो आणि जगभरातील भक्त तो मोठ्या उत्साहात साजरा करतात.
2026 मध्ये जन्माष्टमी कधी आहे? शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
यंदा ४ सप्टेंबर २०२६, शुक्रवार रोजी कृष्ण जन्माष्टमी साजरी होईल. अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राचा संयोग या दिवशी विशेष मानला जातो.
तिथी आणि नक्षत्र वेळ:
- अष्टमी तिथी प्रारंभ: ४ सप्टेंबर २०२६, पहाटे ०२:२५ वाजता
- अष्टमी तिथी समाप्ती: ५ सप्टेंबर २०२६, मध्यरात्री १२:१३ वाजता
- रोहिणी नक्षत्र प्रारंभ: ४ सप्टेंबर २०२६, मध्यरात्री १२:२९ वाजता
- रोहिणी नक्षत्र समाप्ती: ४ सप्टेंबर २०२६, रात्री ११:०४ वाजता
निशिता पूजा मुहूर्त (मध्यरात्रीची पूजा):
भगवान श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री झाल्याने या काळात पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. याला 'निशिता काळ' असे म्हणतात.
- पूजा मुहूर्त: ४ सप्टेंबर रोजी रात्री ११:५७ ते ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:४३ पर्यंत.
- मध्यरात्रीचा क्षण: ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:२० वाजता.
- पुणे येथील मुहूर्त: ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:१० ते १२:५७ पर्यंत.
- मुंबई येथील मुहूर्त: ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:१४ ते ०१:०१ पर्यंत.
पूजा विधी:
जन्माष्टमीच्या दिवशी भक्त निर्जला किंवा फलाहार उपवास करतात. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर दिवसभर उपवास करण्याचा संकल्प करावा. मध्यरात्रीच्या मुहूर्तावर श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. यात बाळकृष्णाला गंगाजल आणि दुधाने स्नान घालणे, नवीन वस्त्रे (पिवळ्या रंगाची शुभ मानली जातात), मोरपंख मुकुट, बासरी आणि वैजयंती माळा घालून सजवले जाते. त्यांना लोणी-मिश्री, फळे, तुळशीची पाने, पंजीरी आणि इतर मिठाईचा नैवेद्य अर्पण केला जातो. पूजेनंतर आरती केली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडला जातो. पारण वेळ (उपवास सोडण्याची वेळ) ५ सप्टेंबर रोजी सकाळी ०६:१३ नंतर आहे, परंतु स्थानिक पंचांगनुसार वेळ बदलू शकते.
जन्माष्टमी कशी साजरी करतात?
जन्माष्टमीला भारतातील विविध भागांमध्ये विविध परंपरा आणि उत्साहाने साजरा केला जातो:
- उपवास आणि पूजा: अनेक भक्त पूर्ण दिवस उपवास करतात आणि मध्यरात्री कृष्णाच्या जन्मानंतर पूजा व आरती करतात.
- दहीहंडी: महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये, जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. यात मानवी मनोरा रचून उंच टांगलेली दही आणि लोणीची हंडी फोडली जाते, जी कृष्णाच्या बाललीलांचे प्रतीक आहे. २०२६ मध्ये दहीहंडी ५ सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल.
- मंदिरांची सजावट: सर्व श्रीकृष्ण मंदिरे दिव्यांच्या रोषणाईने, फुलांनी आणि झुंबरांनी सुंदर सजवली जातात. मंदिरात आणि घरांमध्ये कृष्णाच्या जीवनावरील आकर्षक झाक्या (टेबलो) तयार केल्या जातात.
- रासलीला आणि भजने: अनेक ठिकाणी रासलीला आणि कृष्णलीला यांसारख्या नृत्य-नाटिका सादर केल्या जातात, तसेच भजन-कीर्तन करून मध्यरात्रीपर्यंत जागरण केले जाते.
- पाळणा: बाळकृष्णाला पाळण्यात ठेवून झोका दिला जातो आणि 'हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की' अशा जयघोषात जन्मोत्सव साजरा होतो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीला सार्वजनिक सुट्टी आहे का?
श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२६, ४ सप्टेंबर, शुक्रवार रोजी भारतातील बहुतांश राज्यांमध्ये राजपत्रित (Gazetted) सार्वजनिक सुट्टी असेल. तसेच, अहमदाबाद, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता, लखनौ, पटना, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, तिरुवनंतपुरम आणि विजयवाडा यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये बँकांनाही सुट्टी असेल. तथापि, काही राज्यांमध्ये ही सुट्टी नसते; त्यामुळे स्थानिक पंचांग किंवा शासकीय अधिसूचना तपासून घेणे योग्य ठरेल. महाराष्ट्रात शनिवार असल्याने कार्यलयांना, बॅंकांना सुट्टी आहे.
जन्माष्टमी हा केवळ एक उत्सव नाही, तर तो भगवान श्रीकृष्णाच्या शाश्वत शिकवणी आणि प्रेमाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. या शुभ दिवशी, भगवान श्रीकृष्ण आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि शांतता घेऊन येवो हीच प्रार्थना.