दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रा 2019 प्रारंभ; असे असेल वाहतुकीचे नियोजन

अलोट गर्दीची शक्यता गृहीत धरून सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्यात आली आहे.

जोतिबा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

Jyotiba Chaitra Yatra 2019:  महाराष्ट्राचे आराध्य दैवत, दख्खनचा राजा जोतिबा (Jyotiba) चैत्र पौर्णिमा यात्रा (Chaitra Purnima Yatra) शुक्रवार, 19 एप्रिलपासून सुरु होत आहे. गगनाला भिडणाऱ्या सासनकाठ्या, खोबऱ्यांचे तुकडे,-गुलालाची उधळण, हलगी-ताशांचा कडकडाट अशा मंगलमय वातावरणात ही यात्रा पार पडते. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश आदी राज्यातून रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता लाखो भाविक मोठ्या भक्तीभावाने जोतिबा डोंगरावर दाखल होतात. यंदा शुक्रवारी (दि. 19) यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांच्या अलोट गर्दीची शक्यता गृहीत धरून सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी जोतिबा मंदिराच्या परिसराची पाहणी केली. पोलिसांना सूचना देऊन, बंदोबस्तात वाढ करण्यात आली. यासाठी सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण जिल्ह्यांतून जादा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केली गेली आहे, तिथून डोंगरावर जाण्यासाठी बसेसची सोय आहे. (हेही वाचा: हनुमान जयंती का साजरी केली जाते? जाणून घ्या हनुमानाची जन्मकथा)

असे असेल मार्गाचे नियोजन –

> डोंगरावर जाण्यासाठी केर्ली व कुशिरे फाटामार्गे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा. इतर सर्व मार्ग मोटार वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत.

> केर्ली-कुशिरे गावांवरून येणारी सर्व मोटार वाहने सामाजिक वनीकरण फाटा येथून गायमुखमार्गे जोतिबावर जातील.

> सर्व एस. टी. बसेस व अत्यावश्यक सेवेतील वाहने सामाजिक वनीकरण येथून दानेवाडीमार्गे जोतिबावर जातील.

> घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व वाहने दानेवाडी फाट्याकडून वाघबीळ न जाता गायमुखामार्गे केर्लीकडे उतरतील.

> जोतिबा ते जुने आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतूक दोन्ही मार्गांनी राहील.

> देवदर्शन घेऊन परत जाणाऱ्या वाहनचालकांनी गिरोली बाजूकडील एक दिशा मार्गाचा अवलंब करावा.

> वाघबीळ व शाहूवाडीकडून दानेवाडीमार्गे येणारी सर्व वाहने केर्लीमार्गे जोतिबावर जातील.

> माले, कोडोली, गिरोली, वाघबीळ हे मार्ग फक्त बाहेर जाण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.

> यात्रेच्या काळात (17 एप्रिलपासून) अवजड वाहने, ट्रक, तीनचाकी प्रवासी व मालवाहतूक रिक्षा तसेच ट्रॅक्टरांना डोंगरावर जाण्यासाठी बंदी.

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीने प्रारंभ होतो. यंदा 19 आणि 20 एप्रिल हे दोन दिवस यात्रेचे महत्वाचे दिवस आहेत. यावर्षी 2 लाखांपेक्षा जास्त भाविक डोंगराला भेट देतील असा अंदाज आहे.