Gudi Padwa 2023: गुढीपाडव्यानिमित्त गुढी कशी उभारावी? गुढी उभारण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात? आणि त्याचं महत्त्व काय? जाणून घ्या

त्यामुळे गुढी कशी उभारायची? त्यासाठी कोणत साहित्य लागतं? ते जाणून घेऊयात...

Gudi Padwa 2023 (PC- File Image)

Gudi Padwa 2023: चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरूवात होते. महाराष्ट्रात गुढी पाडवा, कर्नाटकात युगाडी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उगादी, केरळ आणि गोव्यात संवत्सर पाडवा, तामिळनाडूमध्ये युगाडी, काश्मीरमध्ये नवरेह, सिंधमध्ये चेटीचंड, मणिपूरमध्ये साजिबू नोंगमा पनबा किंवा मेतेई चेराओबा म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यात गुढीपाडवा वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाला अतिशय महत्त्व आहे. राज्यात मोठ्या उत्सवात हा सण साजरा केला जातो. गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षास सुरुवात होते. यंदा 22 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा होणार आहे. त्यामुळे गुढी कशी उभारायची? त्यासाठी कोणत साहित्य लागतं? ते जाणून घेऊयात...(हेही वाचा - Gudi Padwa 2023 Rangoli Designs: गुढीपाडव्याला काढता येतील अशा सुंदर आणि हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ)

गुढी कशी उभारावी?

गुढीपाडव्याच्या दिवशी घरात तसेच अंगणात सुंदर सजावट केली जाते. प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे, तेथे सुंदर रांगोळी काढली जाते. गुढीपाडव्याचा विधी सूर्योदयापूर्वी सुरू होतो. लोक सकाळी लवकर उठून आंघोळ करतात. खाली सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील आपल्या घरासमोर गुढी उभारू शकता.

गुढीला रेशमी वस्त्र, कलश, कडूलिंब, बत्ताशांची माळ का लावतात? काय आहे यामागील कारण? जाणून घ्या

गुढी उभारताना वेगवेगळ्या रंगाच्या रेशमी वस्त्राचा वापर केला जातो. प्रत्येक रंग हा विशिष्ट घटकाचे प्रतिक असतो. त्यामुळे या दिवशी गुढीला रेशमी वस्त्र लावले जाते. याशिवाय रेशमी वस्त्राच्या वरच्या बाजूला तांब्याला कलश ठेवला जातो. गुढी हा विजय पताका आहे, म्हणजेच ध्वज आहे. म्हणून गुढीवर उलटा कलश ठेवला जातो. गुढीवर कलश ठेवण्याचा उद्देश जमिनीमार्फत येणारी ऊर्जा आपल्या घराकडे, कुटुंबाकडे यावी हा असतो. याशिवाय गुढीला बत्ताशाची माळ लागली जाते. नववर्षाची सुरुवात गोड व्हावी हा यामागचा उद्देश असतो. तसेच गुढीला कडुलिंबाची पाने लावली जातात आणि कडूलिंबाच्या फुलांपासून बनवलेला प्रसाद अर्पण केला जातो. कारण, बदलत्या वातावरणात रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आवर्जून या दिवशी कडुलिंबाचा प्रसाद खाल्ला जातो. तथीप, हार हे मांगल्याचे प्ततिक असल्याने या दिवशी गुढीला हार लावला जातो.