Gudi Padwa 2022 Date: यंदा गुढी पाडवा कधी साजरा होणार? जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व
गुढी पाडवा हा हिंदू संस्कृतीमधील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक देखील आहे त्यामुळे या दिवशी मुहूर्त न पाहता अनेक शुभ गोष्टी केल्या जातात.
शिवजयंती नंतर आता महाराष्ट्रात हिंदू बांधवांना वेध लागले आहेत ते हिंदू नववर्ष स्वागताचे अर्थतच गुढीपाडव्याचे (Gudi Padwa). गुढी पाडवा हा मराठी नववर्षाचा (Marathi New Year) पहिला दिवस आहे. महाराष्ट्रासोबतच भारतात इतर राज्यांमध्ये गुढी पाडवा हा सण साजरा केला जातो. मागील दोन वर्ष कोरोना संकटामुळे सारेच सण साध्या स्वरूपात आणि घरच्या घरी साजरे करण्याचे आवाहन केले जात होते. मात्र आता कोरोना संकट आटोक्यात आल्याची चिन्हं असताना पुन्हा दणक्यात सण साजरा करण्याला सुरूवात झाली आहे. मग प्रत्येक मराठी मनासाठी खास असलेला गुढी पाडव्याचा सण यंदा कधी आहे? हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर जाणून घ्या यंदा कधी आहे गुढीपाडवा?
यंदा गुढीपाडवा कधी?
गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा दिवशी साजरा केला जातो. यंदा पाडवा 2 एप्रिल 2022 दिवशी आहे. गुढी पाडव्याला महाराष्ट्रात शोभा यात्रा काढून मराठी रूढी-परंपरा यांचा वसा पुढील पिढीला देण्याची रीत आहे. गुढी पाडव्याला मराठी नववर्ष सुरू होत असल्याने घराघरांमध्ये गुढी उभारली जाते. ही प्रतिकात्मक गुढी आनंदाचे, सुखाचे, सकारात्मकतेचे प्रतिक म्हणून पुजले जाते आणि नव्या वर्षाची सुरूवात केली जाते. हे देखील नक्की वाचा: गुढीवरील रेशमी वस्त्र, कलश, कडूलिंब आणि इतर गोष्टींमागील महत्त्व आणि अर्थ काय?).
गुढीपाडवा निमित्त ऋतूमानातील बदल स्वीकारण्याची शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी कडूलिंबाचा पाला खाल्ला जातो. हा पाला गुढीवर पूजला देखील जातो. सोबतच जेवणात साग्रसंगीत गोड-धोड पदार्थांचा समावेश केला जातो. गुढी पाडवा हा हिंदू संस्कृतीमधील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक देखील आहे त्यामुळे या दिवशी मुहूर्त न पाहता अनेक शुभ गोष्टी केल्या जातात. त्यामध्ये सोनं खरेदी पासून अगदी मोठे व्यवहार, घरं, गाडी खरेदी करण्याला अनेकांचं प्राधान्य असतं.