Ganpati Decoration Ideas 2023: गणपती डेकोरेशन, घरगुती पद्धतीने करा बाप्पाची आरास

जेणेकरुन आपण साधी, सोपी पण छान अशी गणपती आरास करुन सर्वाचे लक्ष वेधून घेऊ शकता.

Ganpati Decoration | Representational image (Photo Credits: pxhere)

Ganpati Decoration Ideas 2023: गणपती उत्सव हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण. ज्यासाठी गणेशभक्त, लहानथोर वर्षभर आस लावून बसलेले असतात. कधी एकदा गणरायाचे आगमन होते आणि मोदक, लाडू, ढोल ताशे आणि सजावट यांची धमाल ऊडवून देतो. या सगळ्यात गणपती आरास (Home Ganpati Decoration) हा सर्वात महत्त्वाचा घटक. तुम्हीही तुमच्या घरच्या गणपतीची सजावट हटके करु इच्छित असाल तर आम्ही येथे काही पर्याय देतो आहोत. जेणेकरुन आपण साधी, सोपी पण छान अशी गणपती आरास करुन सर्वाचे लक्ष वेधून घेऊ शकता.

पारंपारिक आरास

एक मजबूत टेबल घ्या. टेबल शक्यतो लाकडी असावे. लोखंडी असेल तरीही चालेल. फक्त ते भक्कम असावे. त्यावर जाड स्वच्छ कापड टाका. हे कापड बेडशीट, चादर असे असे सूती असावे. हे कापड अशा पद्धतीने टाका की टेबलाचे पाय झाकले जातील.  त्यावर एक चौरंग किंवा पाट ठेऊन त्यावर बाप्पांची मूर्ती विराजमान करा. पुढे समई लावून पूजा करा. ही पारंपरीक पद्धत आहे. यात अत्यंत साधेपणाने आरास केली जाते.

फुलांची आरास (Flower Decorations)

हिंदू प्रथा-परंपरांमध्ये फुलांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गणपतीची आरास करतानाही आपण फुलांची आरास करु शकता. त्यासाठी एक मंडप तयार करुन त्यावरुन फुलांचे हार सोडा. बाप्पांच्या आजूबाजूला फुलांच्या पाकळ्या टाका. रंगीबिरंगी फुलांमध्ये बाप्पा उठून दिसतील.

इको-फ्रेंडली सजावट (Eco-Friendly Decor)

खरेतर बाप्पांची मूर्ती ही मातीचीच असते. त्यातही ती खास करुन शाडूच्या मातीपासून बनवतात. पण, पाठिमागील काही काळात बाजारपेठेतील मागणी आणि बदलता प्रवाह यामुळे ती प्लास्टर ऑफ पॅरीस पासून बनविण्यात येऊ लागली. तुम्हाला संधी आहे. आपण पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करु शकता. त्यासाठी मातीच्या किंवा कागदाच्या मातीच्या मूर्ती वापरून पर्यावरणपूरक सजावट निवडा. रंगीत तांदूळ किंवा नैसर्गिक रंगांसारख्या रांगोळ्यांसाठी सेंद्रिय साहित्य वापरा.

कंदील आणि दिवे (Lanterns and Lamps)

गणपतीची आरास करताना आपण विशेष असा रंगीत प्रकाशयोजनेचा छान मिलाप करु शकता. त्यासाठी घराभोवती सजावटीचे कंदील किंवा दिवे (तेल दिवे) लटकवा.  जेणेकरून उबदार आणि उत्सवाचे वातावरण तयार होईल. खास करुन दिव्यांनी सजलेल्या वातावरणात बाप्पांची मूर्ती विराजमान झाल्याचा आपण अनुभव घेऊ शकता.

पर्यावरण मित्रत्वाचा संदेश

गणपती उत्सवादरम्यान आपण आपल्या सजावटीच्या माध्यमातून पाहुण्यांना इको-फ्रेंडली उत्सवाचे महत्त्व सांगा.  त्यांना सण उत्सव साजरे करताना शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करा. लक्षात ठेवा गणेश चतुर्थीचे सार भक्ती आणि उत्सव आहे. आपल्या वैयक्तिक शैली, प्रथा, परंपरा आणि आवड यांचा आधार घेऊन गणपतीची आरास करा. फक्त इतकेच लक्षात ठेवा की, गणपती उत्सवाची आरास करताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत अशा गोष्टींना प्राधान्य द्या. सणांचा आनंद घ्या आणि श्रीगणेशाचा आशीर्वाद घ्या!