लालबागच्या राजासमोरच मंडळाचे कार्यकर्ते आणि मुंबई पोलिसांमध्ये वादावादी

देशा-परदेशातून येणार्‍या भाविकांच्या गर्दीचं व्यावस्थापन करताना मुंबई पोलिस आणि लालाबागचा राजा मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

लालबागच्या राजा मंडळ (Photo credit: Video grab)

मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशा-परदेशातून भाविक गर्दी करतात. या मंडळाची लोकप्रियता जितकी आहे तितकेच या मंडळाशी निगडीत वादही आहेत. काही वर्षांपूर्वी भाविकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप रंगला होता. यंदाही गणेशभक्तांच्या गर्दीमुळे पोलिस आणि कार्यकर्तांमध्ये बाचाबाची झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत.

मुंबई पोलिस आणि कार्यकर्ते भिडले

काल घरगुती गणपतींचं 5 दिवसांनी विसर्जन झाल्यानंतर आजपासून सार्वजनिक गणपतींना भेट देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. सामान्य भाविकांसोबतच व्हीआयपी आणि सेलिब्रिटींनी लालबागच्या राजाला गर्दी करायला सुरूवात केली आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर ताण येत आहे.

भाविकांना सुरक्षित आणि वेळेत दर्शन मिळावे म्हणून लालबागचा राजा सार्वजनिक मंडळामध्ये पोलिसांसोबतच मंडळाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक अहोरात्र काम करत असतात. अशावेळेस आजपासून गर्दी वाढल्याने भक्तांना मार्ग करून देताना कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. हे प्रकरण गंभीर होऊ नये म्हणून तात्काळ उपस्थित कार्यकर्त्यांनी सामंजस्याने हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

मुखदर्शनाच्या रांगेत गोंधळ

लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाच्या रांगेत असलेल्या भाविकांना पोलिस एका बाजूने जायला सांगत होते तर कार्यकर्त्यांच्या मते मंडळ त्यांचं असल्याने ते ठरवतील यावरून गोंधळ झाला. काही काळ या प्रकरणामुळे मंडपात कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

लालबागच्या राजाला गर्दी

लालबागच्या राजाला मुखदर्शन, नवसाची रांग आणि व्हीआयापींसाठी मार्ग ( विशेष रांग) अशा स्वरूपात रांगेचं नियोजन केलं जातं. मात्र आज सामान्य भाविकांसोबतच अनेक व्हीआयपी आणि सेलिब्रेटींनीही गर्दी केल्याने भक्तांना मार्ग करून देताना कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. आज सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, सुप्रिया सुळे आणि परिवार, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

लालाबागच्या राजाच्या मंडळात सुमारे 5000 स्वयंसेवक दहा दिवस काम करत असतात. त्यांच्या बरोबरीने मुंबई पोलिसांवर भक्तांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते. ८५ वर्षातील लालबागच्या राजाचं बदलतं रूप