बाप्पा आले! अशी करा गणपतीची प्रतिष्ठापना
आम्ही आपल्याला सांगत आहोत कमी वेळात आणि योग्य पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना कशी केली जाते.
राज्यभर आज गणपती बाप्पांच्या आगमनाचा सोहळा सुरू आहे. ज्यांच्या घरी गणपती येतात त्यांनी आज पहाटेपासूनच मोठ्या उत्साहात मूर्तीच्या प्रतिष्ठापणेची तयारी केली असेल. तर, काहींच्या घरी बाप्पा यायचे असतील. सार्वजनिक गणेश मंडळांचे बाप्पा यायला अजून काहीसा अवकाश आहे. असे असले तरी काही मंडळी मात्र, भलतीच नाराज झाली असतील कारण, या मंडळींना ऑफिसमधून सुट्टी मिळाली नसेल. किंवा काही कारणामुळे गणेशाची प्रतिष्ठापना गडबडीत करावी लागण्याची शक्यता आहे. अशा मंडळींसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे. आम्ही आपल्याला सांगत आहोत कमी वेळात आणि योग्य पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना कशी केली जाते.
पूजेसाठी योग्य वेळ
जाणकार पंचांगकर्ते सांगतात की, 13 सप्टेबर म्हणजेच गणेश चतुर्थीचा दिवशीचा मध्यान काळ हा प्रशस्त आहे. साधारण 11.21 ते 1.48 पर्यंतचा काळ हा मध्यानकाळाचा आहे. गणेशपूजनासाठी हा काळ अनुकूल आहे. मात्र, ज्या मंडळींना या काळात गणेशपूजा करता येणार नाही, अशा मंडळींनी पहाटे 4 ते सूर्यास्तापर्यंत कधीही पूजा केली तरी, चालू शकते. सकाळी लवकर उठून घरातील देवपूजा आटपून घ्या. त्यानंतर मग गणेशपूजेची तयारी पूर्ण करून बाप्पांची प्रतिष्ठापणा करा.
गणपती पूजेसाठी आवश्यक साहित्य.
अक्षता, गुलाल, अष्टगंध, हळद, कुंकू, सुपारी १०, खारीक ५, बदाम ५, हळकुंड ५, अक्रोड५, कलश २, ताम्हण १, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर, ब्लाउज पीस १, कापसाची वस्त्रे, जानवी जोड २, पंचा १, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार १, आंब्याच्या डहाळे, नारळ २, फळे ५, विड्याची पाने २५, पंचामृत.
पूजेची तयारी
गणेशमूर्ती ही पूजेची तयारी करण्यापूर्वीच आणलेली असावी. शक्यतो आदल्याच दिवशी आणलेली केव्हाही चांगली. पूजेचे साहित्य तयार ठेवा. गणेशमूर्ती मखरात ठेवावी. बाप्पांचे आसन वैगेरे योग्य त्या पद्धतीने ठेवा. घरात कोणताही वादविवाद नको. सर्वांनी प्रसन्न मनाने आनंदी असावे. देवाला कोणतीही वस्तू समर्पीत करताना शक्यतो उजव्या हाताचा वापर करावा. मूर्तीवर पाणी, पंचामृत अर्ध्य वाहताना फुलांचा वापर करा. ज्येष्ठ व्यक्तिपैकी एकाने पूजा सांगावी. तर, दुसऱ्याने पूजा करावी.
कशी कराल गणेशपूजा
पूजेची सुरूवात करण्यापूर्वी प्रथम कपाळी तिलख धारण करून आचमन करा. देवासमोर पानसुपारीचा विडा ठेवा. प्रथम देवास नमस्कार करा, त्यानंतर आई-वडील आणि वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. मगच पूजेला प्रारंभ करा. आसनावर बसतात हातात अक्षता घ्या आणि गणरायाचे स्मरण करा. हातातील अक्षता गणेशचरणी वाहा. उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन मंत्रोच्चार करा, दरम्यान, त्या पाण्यात गंध, अक्षता फुले घ्या. बाप्पांचे स्मरण करून गणेशमूर्तीसमोरील वस्तूंचे (कलश, शंख, घंटा, दिवा, समई) पूजन करा. त्यानंतर उजवा हात मूर्ती वर ठेऊन दुसरा (डावा)हात आपल्या हृदयावर ठेवा. या स्थिती गणेशाचे स्मरण करा. पुढे गणेश चरण, मूर्ती वर दुर्वा वाहा. आणि फुलांनी पाणी शिंपडा. ताम्हणात 4 वेळा पाणी सोडायला विसरू नका. हा विधी झाल्यानंतर मूर्तीवर पाणी शिंपडा, चरणांवर पंचामृत, अक्षता वाहा. गंध, हळद लाऊन फुले, हार, कंठी, दुर्वा वाहाव्यात. मूर्तीच्या प्रत्येक अवयवावर अक्षता वाहा. धूप, अगरबत्ती, दीप, निरांजन आदींनी मूर्तीला ओवाळा. नैवेद्य, प्रसाद, विडा, अर्पण करा. विड्यावर स्वच्छेने दक्षिणा ठेवा. समोरच्या नारळावर पळीभर पाणी सोडून त्यावर एक फूल वाहा आणि नमस्कार करा. त्यानंतर आरती करा आणि स्वत:भोवती प्रदक्षिणा घाला. अखेर गणेशमूर्तीस नमस्कार करून, पळीभर पाणी ताम्हणात सोडा. शेवटी नमस्कार करून मूर्तीपासून बाजूला व्हा. अशापद्धतीने तुमची मूर्तीपूजा पूर्ण करू शकता.