Eid-e-Milad 2023 Processions: गणपती विसर्जनामुळे 'ईद-ए-मिलाद'च्या मिरवणुका पुढे ढकलल्या; मुंबई, पुणे येथील मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय
यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्याने कोणतीही समस्या टाळण्यासाठी ईद ए मिलादच्या मिरवणुका एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या 27 आणि 28 सप्टेंबरला देशभरात मुस्लीम बांधवांचा ‘ईद ए मिलाद’ (Eid-e-Milad) हा सण साजरा होत आहे. अरबी भाषेत मिलादचा अर्थ 'जन्म' असा असून या दिवशी 'हजरत मुहम्मद साहब’ यांचा जन्म झाल्याची मान्यता आहे. मात्र याचवेळी राज्यात गणपती विसर्जनाची धामधूम पाहायला मिळणार आहे. मुंबईमध्ये तर गणपती विसर्जनाच्या मोठ-मोठ्या मिरवणुका निघतात. अशात मुंबईत ईद-ए-मिलाद जुलूस किंवा मिरवणुका 29 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्याने कोणतीही समस्या टाळण्यासाठी ईद ए मिलादच्या मिरवणुका एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी भायखळा येथील खिलाफत हाऊस येथे एक बैठक पार पडली त्यामध्ये हा हा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ मौलवी मौलाना मोईन अश्रफ कादरी (मोईन मियाँ) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत, ईद-ए-मिलाद 28 सप्टेंबरला असली तरीही शांतता आणि सौहार्दाच्या हितासाठी जुलूस एक दिवस पुढे ढकलल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
मोईन मियां म्हणाले, ‘आमच्या पवित्र पैगंबरांनी आम्हाला संघर्ष टाळायला आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रातील निर्णयांमध्ये व्यावहारिक राहण्याची शिकवण दिली. देशातील परिस्थिती लक्षात घेता, आम्ही ईद-ए-मिलाद मिरवणूक 29 सप्टेंबर रोजी काढू.’ याबाबत पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण चौधरी म्हणाले, ‘मुस्लीम समाजाने गणपती विसर्जनानंतर एक दिवस ईद-ए-मिलादच्या मिरवणुका काढण्याचा निर्णय घेतला हे चांगले आहे. यामुळे जनतेची गैरसोय कमी होण्यास मदत होईल. हा निर्णय अजूनतरी अधिकृतपणे आम्हाला कळविण्यात आलेला नाही, परंतु आम्ही त्याचे स्वागत करतो.’ (हेही वाचा: Ganpati Decoration Ideas 2023: गणपती डेकोरेशन, घरगुती पद्धतीने करा बाप्पाची आरास)
दुसरीकडे पुण्यातही प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त काढण्यात येणारी ईद-ए-मिलादची मिरवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील सीरत समितीने घेतलेल्या निर्णयानुसार, गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदाय एकच मार्ग वापरत असल्याने, यंदा पुण्यात ईद-ए-मिलादची मिरवणूक 1 ऑक्टोबर रोजी निघणार आहे.