Eid al-Adha 2025 History, Significance: भारतामध्ये 7 जून 2025 रोजी साजरा होईल ईद अल-अधा म्हणजेच बकरी ईदचा सण; जाणून घ्या या दिवसाचा इतिहास व महत्त्व
ईद उल-अधा हा सण त्याग, विश्वास आणि दान यांच्या मूल्यांना प्रोत्साहन देतो. कुर्बानी, म्हणजेच पशुबलिदान, हा या सणाचा केंद्रीय विधी आहे, जो इब्राहिम यांच्या बलिदानाच्या तयारीचे स्मरण करतो.
जगभरातील मुस्लिम समुदायाचे लोक या आठवड्याच्या शेवटी बकरी ईद (Bakrid 2025) साजरी करतील. भारतात बकरी ईद शनिवार, 7 जून रोजी आहे, परंतु चंद्रदर्शनावर अवलंबून तारीख बदलू शकते. बकरी ईद म्हणजेच ईद उल-अधा (Eid al-Adha) किंवा ईद-उझ-जुहा इस्लामिक कॅलेंडरच्या शेवटच्या महिन्यातील जिलहिज्जाच्या दहाव्या दिवशी साजरी केली जाते. मुस्लिमांचे पैगंबर आणि हजरत मोहम्मद यांचे पूर्वज हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी ही ईद साजरी केली जाते. हा सण विश्वास, त्याग, आणि दान यांचे महत्त्व अधोरेखित करतो आणि जगभरातील मुस्लिम समुदायात चार दिवस साजरा केला जातो.
ईद उल-अधा हा सण प्रेषित इब्राहिम यांच्या अल्लाहप्रती निष्ठेच्या कथेवर आधारित आहे. इस्लामिक परंपरेनुसार, अल्लाहने इब्राहिम यांना त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या सर्वात प्रिय वस्तूचे बलिदान देण्यास सांगितले. इब्राहिम यांनी ही आज्ञा मान्य केली, आणि आपला मुलगा इस्माइल याचे बलिदान देण्याचा निर्णय घेतला इस्माइल यांनीही त्यांच्या वडिलांच्या विश्वासाला पाठिंबा दिला. जेव्हा इब्राहिम बलिदान देण्यास सज्ज झाले, तेव्हा अल्लाहने त्यांची परीक्षा पूर्ण झाल्याचे सांगत इस्माइलच्या जागी एक मेंढा दिला.
ही कथा कुराणमधील 37व्या सूरात नमूद आहे आणि ती विश्वास, आज्ञापालन आणि अल्लाहच्या दयेचे प्रतीक आहे. हा सण हज यात्रेच्या समाप्तीशीही जोडलेला आहे, जी इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. हज ही मक्का येथील वार्षिक तीर्थयात्रा आहे, जी सक्षम मुस्लिमांनी आयुष्यात किमान एकदा करणे बंधनकारक आहे. ईद उल-अधाच्या दिवशी हज यात्रेकरू अराफात पर्वतावर प्रार्थना करतात आणि शैतानाला दगड मारण्याचा विधी करतात, जो इब्राहिम यांनी शैतानाच्या प्रलोभनांना नकार दिल्याचे प्रतीक आहे.
ईद उल-अधा हा सण त्याग, विश्वास आणि दान यांच्या मूल्यांना प्रोत्साहन देतो. कुर्बानी, म्हणजेच पशुबलिदान, हा या सणाचा केंद्रीय विधी आहे, जो इब्राहिम यांच्या बलिदानाच्या तयारीचे स्मरण करतो. या विधीत मेंढी, बकरी अशा पशुचा बलिदान दिला जातो, आणि त्याचे मांस तीन भागांत वाटले जाते: एक तृतीयांश कुटुंबासाठी, एक तृतीयांश मित्र आणि नातेवाईकांसाठी, आणि एक तृतीयांश गरीब आणि गरजूंना दान केले जाते. ही प्रथा दानशीलता आणि सामाजिक समानतेचे महत्त्व दर्शवते.
हा सण केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक एकतेचा संदेशही देतो. ईद उल-अधा दरम्यान मुस्लिम समुदाय एकत्र येऊन प्रार्थना करतो, अन्न आणि भेटींची देवाणघेवाण करतो आणि गरजूंना मदत करतो. हा सण विश्वास आणि नम्रतेच्या भावनेला प्रोत्साहन देतो, ज्यामुळे व्यक्ती आपल्या कृतींचा पुनर्विचार करतात आणि चांगले मुस्लिम बनण्याचा प्रयत्न करतात. ईद उल-अधा हा सण जगभरात विविध पद्धतींनी साजरा केला जातो, परंतु त्याचे मूळ धार्मिक आणि सामाजिक मूल्ये सर्वत्र समान असतात.
सणाची सुरुवात सकाळी ईद नमाजाने होते, जी मशिदींमध्ये किंवा खुल्या मैदानात सामूहिकरित्या अदा केली जाते. प्रार्थनेनंतर कुर्बानीचा विधी केला जातो. बलिदान दिलेल्या पशुचे मांस वाटप केले जाते. दरम्यान, या सणाची तयारी काही आठवडे आधीपासून सुरू होते. मुस्लिम समुदाय कुर्बानीसाठी पशु खरेदी करतात, नवीन कपडे खरेदी करतात आणि घरे स्वच्छ करतात. अनेकजण दान संस्थांमार्फत कुर्बानीचे मांस गरजूंना पोहोचवण्याची व्यवस्था करतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)