Dussehra 2020 Special: विजयादशमी दिवशी भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरांमध्ये होते रावणाची पूजा!
परंतु, देशातही अशीही काही मंदिरं आहेत जिथे रावणाची पूजा केली जाते. भगवान शंकरा प्रती रावणाची असलेली भक्ती, समर्पण या कारणाने या गावांमध्ये रावणाची पूजा करतात.
अधर्मावर धर्माचा, चांगल्यावर वाईटाचा आणि असूरावर सूराचा विजय याचे प्रतिक म्हणून विजयादशमी किंवा दसरा साजरा केला जातो. आश्विन शुद्ध दशमीला रामाने रावणाचा वध केला असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो. रावणावर श्रीरामाने मिळवलेला विजय म्हणून हा दिवस संपूर्ण देशभरात अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देशातील विविध ठिकाणी लंकापती रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जातात. परंतु, देशातही अशीही काही मंदिरं आहेत जिथे रावणाची पूजा केली जाते. भगवान शंकरा प्रती रावणाची असलेली भक्ती, समर्पण या कारणाने या गावांमध्ये रावणाची पूजा करतात. तर जाणून घेऊया भारतातील प्रसिद्ध रावण मंदिरांविषयी आणि तेथील रावण भक्तीविषयी: (Dussehra 2020 Date: यंदा दसरा कधी साजरा होणार? जाणून घ्या साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या सणाचे महत्त्व)
रावण मंदिर बिसरख, उत्तर प्रदेश
बिसरख हे रावणाचे जन्मस्थान मानले जाते. तसंच या गावाचे नावही रावणाचे वडील विश्रवा यांच्या नावावरुन ठेवण्यात आल्याचे मानले जाते. ग्रोव वनातून मिळालेले शिवलिंग स्थापन करण्यासाठी गावात विश्रवा यांनी एका मंदिर स्थापन केले. त्यामुळे दसऱ्या दिवशी या गावातील लोक शोक व्यक्त करतात.
जोधपुर रावण मंदिर, राजस्थान
मैदगिल ब्राह्मण समुदाय हा रावणाचे वंशज आहेत, असे मानले जाते. मंदोदरी सोबत विवाह करण्यासाठी रावण लंकेहून येथे आला होता. रावण-मंतदोदरी विवाहसोहळा मंडोर येथे पार पडला. मंदोदरीच्या नावावरुन मंडोर हे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या गावातील लोक रावणाला आपला जावई मानतात. या गावात रावणाच्या अनेक मुर्त्या आहेत.
बैजनाथ मंदिर कांगडा, हिमाचल प्रदेश
बैजनाथ येथील कांग्रा शहरात रावणाचा सन्मान केला जातो. पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगात रावणाने भगवान शिवची पूजा केली होती. शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी हवनकुंडात मस्तक अर्पण केले होते. रावणाच्या या भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले आणि रावण दशनन म्हटले. शिवाप्रती असलेली रावणाच्या भक्तीमुळे गावकरी रावणाची पूजा करतात.
काकीनाडा रावण मंदिर, आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशमधील हे एकमेव स्थान आहे जिथे रावणाची पूजा केली जाते. शिव मंदिर बांधण्यासाठी रावणाने या जागेची निवड केली होती. येथील मंदिरात शिवलिंगसह रावणाची प्रतिमा आहे. प्रवेशद्वारावरच दशमुखी रावणाची विशाल प्रतिमा पाहायला मिळते.
रावणग्राम मंदिर, मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातील विदिशा शहरात रावणग्राम मंदिर आहे. येथील गावकरी रावणाचे भक्त आहेत. या मंदिरात रावणाची 10 फुटी भव्य मुर्ती असल्याने हे मंदिर अनोखे आहे. कन्याकुब्ज ब्राह्मणांनी हे मंदिर बांधले होते. कन्याकुब्ज ब्राह्मण हा एक रावणाचा संप्रदाय मानला जातो. या शहरात दसऱ्याच्या दिवशी कोणताही उत्सव होत नाही. मात्र इतर आनंदी प्रसंगी रावणाची पूजा केली जाते.
गडचिरोली, महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या गडचिरोली भागातील गोंड जमातीचे लोक रावण आणि विभीषण यांना मानतात. रावणाने काहीही चूक किंवा क्रूर केलेले नाही, यावर त्यांचा विश्वास आहे. दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यावर येथील लोकांनी बहिष्कार घातला आहे.
देशभरातील बहुतांश ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. मात्र या मंदिरांमध्ये रावणाचे पूजन केले जाते. दरम्यान, यंदा कोविड संकटामुळे दसऱ्याचा सण अगदी साधेपणाने साजरा करावा लागणार आहे.