Diwali 2020: यंदा दिवाळीच्या दिवशी 17 वर्षांनंतर सर्वार्थसिद्धि योग; पुष्य नक्षत्रापासून दिवाळी पर्यंत महत्त्वाच्या खरेदीचे 7 शुभ मुहूर्त!
त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन खरेदी करत असाल तरी देखील सावध रहा. हॅकर्स ऑनलाईन व्यवहारांमध्ये तुम्हांला लुटू शकतात.
भारतामध्ये दिवाळी (Diwali) हा सर्वात मोठा सण जल्लोषात साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने अनेक गोष्टींच्या खरेदीची रेलचेल असते. अगदी सोन्याच्या वस्तूंपासून, घर, गाडी खरेदी ते सणानिमित्त एकमेकांना भेटवस्तू देण्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. दरम्यान सोनं, घर, गाडी अशा महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करताना अनेकजण चांगले मुहूर्त पाहून त्याची खरेदी किंवा डिलेव्हरीची वेळ, तारीख ठरवतात. मग यंदाची दिवाळी अवघ्या आठवड्याभरावर आली असताना तुमच्या मनातही हाच प्रश्न असेल नेमकी कोणती वस्तू कोणत्या शुभ मुहूर्तावर घ्यावी तर पहा यंदा 7 नोव्हेंबरपासून 14 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या दिवसापर्यंत कोणकोणते शुह मुहूर्त आहेत?
यंदा दिवाळीचा दिवस हा खास आहे. कारण सुमारे 17 वर्षांनंतर सर्वार्थसिद्धि योग देखील याच दिवशी आहे. असा योग यापूर्वी 2003 साली आला होता असं सांगितलं जातं. त्यामुळे यंदा दिवाळीच्या दिवशी खरेदीसाठी चांगला दिवस आहे.
7-14 नोव्हेंबर मधील महत्त्वाचे दिवस, शुभ मुहूर्त
7 नोव्हेंबर - शनिवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र आल्याने हा शनिपुष्य योग झाला आहे. दिवसभर रवियोग देखिल असल्याने प्रॉपर्टी, फर्निचर, मशिनरी यांची खरेदी करण्यासाठी हा दिवस चांगला आहे.
8 नोव्हेंबर - रविवार सोबत या दिवशी कुमार योग आहे. अश्लेषा नक्षत्र आणि अष्टमी आल्याने शुभ मुहुर्तांमध्ये त्याची गणना होणार आहे. या दिवशी खाण्याच्या काही गोष्टी आणि औषधांची खरेदी फायदेशीर ठरते.
9 नोव्हेंबर - सोमवार आणि मघा नक्षत्र एकत्र आल्याने दिवाळीच्या निमित्ताने महिलांसाठी काही खरेदी करणार असाल तर हा चांगला योग आहे. यामध्ये मिठाई, मोती, सुगंधित वस्तूंच्या खरेदीचा देखील मुहूर्त आहे.
10 नोव्हेंबर- इंद्र योगासोबत मंगळवार आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येत असल्याने या दिवशी इलेक्स्ट्रॉनिकशी निगडीत काही खरेदी करायची असेल तर शुभ मुहूर्त आहे. प्रॉपर्टीच्या अनुषंगाने देखील हा खरेदीचा चांगला दिवस आहे.
11 नोव्हेंबर - उत्तरफाल्गुनी नक्षत्रामध्ये या दिवशी चंद्र आणि मंगळाच्या संबंधातून महालक्ष्मी योग आहे. त्यामुळे अवजार, वाहन आणि मशिनच्या खरेदीचा चांगला योग आहे.
12 नोव्हेंबर - यंदा दिवाळीची सुरूवात या दिवसापासून होत आहे. त्यामुळे हस्त नक्षत्राच्या योगानुसार, वाहन, दागिने, घर, जमीन यांच्या खरेदीचा हा चांगला योग आहे. Diwali 2020: धनतेरस च्या दिवशी का खरेदी करतात सोने-चांदी किंवा तांब्या-पितळाची भांडी? जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त.
14 नोव्हेंबर - यंदा दिवाळी 14 नोव्हेंबरला आहे. सूर्योदयापासून या दिवशी सर्वार्थसिद्धियोग सुरू होत आहे. रात्री 8 वाजेपर्यंत तो राहणार आहे. या दिवशी लक्ष्मीपूजन देखील केले जाणार आहे. या दिवशी सोनं खरेदी केलं जाऊ शकतं.
दरम्यान दिवाळीच्या सणावर यंदा कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन खरेदी करत असाल तरी देखील सावध रहा. हॅकर्स ऑनलाईन व्यवहारांमध्ये तुम्हांला लुटू शकतात. सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी, व्यवहार करताना Bank Frauds चा धोका; या 6 बॅंकिंग आर्थिक फसवणूकीच्या मार्गांबाबत दक्ष रहा!
(टीप: वरील लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. यामध्ये कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. धार्मिक भावना दुखावण्याचा, अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.)