Diwali 2019: धनत्रयोदशी दिवशी 'या' मुहूर्तावर सोने खरेदी करणे आहे फायदेशीर; जाणून घ्या यामागील महत्व
याच निमित्ताने आपणही सोन्याचे दागिने, चांदीचे नाणी, भांडी इत्यादींची खरेदी करू इच्छित असाल तर तत्पूर्वी या वस्तूंच्या खरेदीचा यंदाचा शुभ मुहूर्त नक्की जाणून घ्या..
दिवाळीला आता अवघा एक आठवडा शिल्लक असताना सर्वत्र खरेदीची धामधूम पाहायला मिळतेय. घराच्या सजावटीपासून ते कपड्यांपर्यंत सर्व वस्तूंचे हटके ट्रेंड बाजरात आले असून त्याच्या खरेदीसाठी लोकंही उत्साहात दिसत आहेत. यासोबतच दिवाळीच्या सणात आणखीन एका गोष्टीच्या खरेदीला खास महत्व असते आणि ते म्हणजे सोने. दिवाळी आधी दोन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा 25 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी (Dhanteras 2019) साजरी होणार आहे. याच निमित्ताने आपणही सोन्याचे दागिने, चांदीचे नाणी, भांडी इत्यादींची खरेदी करू इच्छित असाल तर तत्पूर्वी या वस्तूंच्या खरेदीचा यंदाचा शुभ मुहूर्त नक्की जाणून घ्या..
सोने खरेदीचा मुहूर्त
वास्तविक धनत्रयोदशीचा संपूर्ण दिवस हा सोने खरेदीच्या दृष्टीने शुभ मानला जातो. मात्र त्यातही जर का मुहूर्त पाहायचा असेल तर 25 ऑक्टोबर व 26 ऑक्टोबर रोजी ग्रहांची स्थिती आणि सोने खरेदीसाठी अनुकूल परिस्थिती आहे.
25 ऑक्टोबर: संध्याकाळी 7 वाजून 8 मिनिटांनी प्रारंभ
26 ऑक्टोबर: दुपारी 3 वाजून 46 मिनिटांनी समाप्ती
धनत्रयोदशीला सोने खरेदी का करावी?
धन्वंतरी जयंती किंवा धनत्रयोदशी अशी ओळख असणाऱ्या या सणाच्या दिवशी घरातील धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच लक्ष्मीसोबतच धनाचे भांडार असलेल्या कुबेराची पूजा करण्याला देखील खास महत्व आहे. यादिवशी प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे सोन्या, चांदीच्या वस्तूंची खरेदी करतो. या धनाचे पूजन करून घरावर अशाच प्रकारे लक्ष्मीची कृपा राहावी अशी प्रार्थना केली जाते. या शुभ मुहूर्तावर धनाची देवता लक्ष्मी देखील आपल्या भक्तांना अखंड समृद्धीचे वरदान देत असल्याची समज आहे.
यंदाचे दिवाळीचे वेळापत्रक पाहिल्यास वसुबारस आणि धनत्रयोदशी हे मुहूर्त एकाच दिवशी जुळून आले आहेत. वसुबारसाच्या दिवशी आपल्याकडील गोधनाची पूजा करण्याची परंपरा आहे. गायीच्या पूजनाने सर्व देवतांपाशी आपली सेवा पोहचत असल्याचे मानले जाते.