Chief Minister Dahi Handi Utsav: ठाण्यात कोपरी शिवसेनेतर्फे 'मुख्यमंत्री दहीहंडी उत्सवा'चे आयोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुत्र श्रीकांत शिंदे यांना निमंत्रण
यंदा उत्सवाचे दुसरे वर्ष असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे.'
कोपरी शिवसेना शाखेतर्फे ठाण्यातील (Thane) कोपरी भागात 7 सप्टेंबर रोजी ‘मुख्यमंत्री दहीहंडी उत्सव’ (Chief Minister Dahi Handi Utsav) आयोजित केला जाणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोपरी पाचपाखाडीचे प्रमुख राम रेपाळे, ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, प्रकाश कोटवानी, संतोष बोडके आदी उपस्थित राहणार आहेत. पुढील वर्षी प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानसही कोतवानी यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे उपशहरप्रमुख कोतवानी म्हणाले, ‘मागच्या वर्षी कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा उत्सवाचे दुसरे वर्ष असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. यंदा तीन हंडी- मुंबई-ठाण्यात एक, महिलांसाठी एक आणि कोपरीकरांसाठी एक असे आयोजन करण्यात आले आहे.’
आठ थरांसाठी 21 हजार रुपये, सात थरांसाठी 11 हजार रुपये, सहा थरांसाठी 6000 रुपये, पाच थरांसाठी 5000 रुपये आणि चार थरांसाठी 3000 रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय स्थानिक गोविंदांना तसेच महिलांना उत्तेजनार्थ पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. (हेही वाचा: Shri Krishna Aarti: श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या रात्री 'हा' पाळणा, आरती गाऊन करा जन्माष्टमीची पूजा)
गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, रुग्णवाहिका आणि डॉक्टर्स तैनात करण्यात येणार आहेत. दहीहंडी उत्सवासाठी दिवसभर मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह शिवसेना आमदारांच्या उपस्थितीत हा दहीहंडी उत्सव पार पडेल. शिवसेनेच्या कोपरी शाखेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी हंडी उभारण्यात येणार आहे. ही खास हंडी निर्भया महिला गोविंदा टीम फोडणार आहे.