Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026: तारखेनुसार आणि तिथीनुसार कधी साजरी होणार शिवजयंती? जाणून घ्या सविस्तर
2026 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार साजरी केली जाणार आहे. या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व आणि उत्सवाचे स्वरूप याबद्दलची ही सविस्तर माहिती.
मुंबई: आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 2026 मध्ये शिवजयंती दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी होणार आहे. महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे स्वीकारलेली तारीख आणि हिंदू पंचांगाप्रमाणे येणारी तिथी, या दोन्हीनुसार शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळणार आहे.
19 फेब्रुवारी: तारखेनुसार शिवजयंती
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार, दरवर्षी 19 फेब्रुवारी हा दिवस 'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' म्हणून अधिकृतपणे साजरा केला जातो.2026 मध्ये 19 फेब्रुवारी रोजी गुरुवार असून या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 1869 मध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली आणि पुण्यात पहिली शिवजयंती साजरी केली होती, ही परंपरा आजही तितक्याच जोमाने सुरू आहे.
6 मार्च: तिथीनुसार शिवजन्मोत्सव
अनेक शिवप्रेमी आणि संस्था हिंदू पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती साजरी करतात. 2026 मध्ये ही तिथी 6 मार्च, शुक्रवार रोजी येत आहे. पंचांगानुसार, तृतीया तिथी 5 मार्च २०२६ रोजी संध्याकाळी 5:०3 वाजता सुरू होईल आणि 6 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:53 वाजता समाप्त होईल. यामुळे तिथीनुसार शिवजयंती शुक्रवारी साजरी केली जाईल.
शिवनेरीवर मुख्य सोहळा आणि सुरक्षा
दरवर्षीप्रमाणे शिवनेरी किल्ल्यावर, जिथे महाराजांचा जन्म झाला, तिथे मुख्य शासकीय सोहळा पार पडणार आहे. पहाटेचा जन्मोत्सव सोहळा, पाळणा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी प्रशासनाकडून आतापासूनच केली जात आहे. किल्ल्यावर होणारी गर्दी लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाकडून विशेष सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे.
शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रत्येक गड-किल्ल्यावर आणि गावोगावी मिरवणुका काढल्या जातात. ढोल-ताशांच्या गजरात आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषात अवघा महाराष्ट्र शिवमय होतो. शाळा-महाविद्यालयांमध्ये पोवाडे, निबंध स्पर्धा आणि व्याख्यानांचे आयोजन करून महाराजांच्या पराक्रमाचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवला जातो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)