Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साजरा होणार शिवजयंती उत्सव; राज्यगीत, शिववंदना, पोवाडा गायनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, घ्या जाणून

19 फेब्रुवारीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्या ठिकाणी पुतळे/स्मारके आहेत, तेथे जयंती साजरी करण्यात यावी, असे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक देदिप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी त्यांच्याप्रति कृतज्ञता अर्पण करणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. राज्यातील सर्वांनी शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करावी, असे आवाहन वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

यासंदर्भात, मंत्री मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असून प्रत्येक जिल्ह्यात शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी, सर्वांचा सहभाग घेत साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवजयंती ज्या ठिकाणी साजरी होईल, त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ सुंदर व आकर्षक ठेवावा. कार्यक्रमाच्या ठिकाणी रंग-रंगोटी करुन रोषणाई करणे, रांगोळी काढणे आदी व्यवस्था करण्याबाबत कळविले आहे.

शिवजयंती उत्सवाच्या आरंभी राज्यगीत वाजविण्यात यावे व त्यासाठी पोलीस बँडची व्यवस्था करावी. कार्यक्रमाच्या आधी व कार्यक्रमादरम्यान शिववंदना, स्थानिक कलावंतांकडून पोवाडा गायन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील गीत-गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, शौर्यगीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. यासंदर्भात स्थानिक जिल्हास्तरावर व्यापक प्रसिध्दी करावी. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचा यामध्ये सहभाग असावा, अशा सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. (हेही वाचा: Marathi Bhasha Gaurav Din 2024 Date: मराठी भाषा गौरव दिन कधी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व!

कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर प्रसिद्धीसाठी टीजर, शॉर्ट क्लिप, ग्राफिक्स, विविध मान्यवर यांच्या आवाहनाचे छोटे व्हिडिओ प्रसारण अशा पद्धतीने समाज माध्यमांचा उचित उपयोग करावा. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करावे, अशा सूचनाही मंत्री मुनगंटीवार यांनी केल्या आहेत. राज्य शासनामार्फत दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. 19 फेब्रुवारीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्या ठिकाणी पुतळे/स्मारके आहेत, तेथे जयंती साजरी करण्यात यावी, असे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत. त्याचीही अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.