Chardham Yatra 2021: चारधाम यात्रेची तयारी सुरु; मेच्या दुसर्या आठवड्यापासून होणार सुरुवात
विंटर सिक्युरिटीत तैनात असलेल्या सैनिकांनाही ते भेटले आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली
चार धाम यात्रा 2021 (Char Dham Yatra 2021) च्या तारखा जाहीर होण्याच्या एक आठवड्यापूर्वी उत्तराखंड सरकारने यंदाच्या तीर्थयात्रेची तयारी सुरू केली आहे. चार धाम देवस्थानम मॅनेजमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविनाथ रमण म्हणाले, 'आम्ही केदारनाथ आणि बद्रीनाथमधील सर्वात महत्वाच्या बांधकामांच्या रूपरेषावर काम सुरू केले आहे. केदारनाथ येथील रावल व पुजारी निवास आणि भोगमंडी यांचे बांधकाम सुरू करण्यासाठी कृती योजना तयार केली जात आहे.' यासह मेच्या दुसर्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेचे होमवर्कही सुरु झाले आहे.
सीएम त्रिवेन्द्रसिंग रावत आणि कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तराखंड चारधाम देवस्थानम व्यवस्थापन मंडळाने सन 2020 मध्ये चारधाम यात्रा यशस्वीरित्या पार पाडली. इतकेच नव्हे तर चारधाम यात्रेतील कोरोना संक्रमण शून्य होते आणि यात्रा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण झाली. बार्कोट (यमुनोत्री) आणि मनेरी, उत्तरकाशी (गंगोत्री) देवस्थानम बोर्डाची कार्यालये 2020 मध्ये स्थापित करण्यात आली होती. आता त्यांना अधिक सक्रिय केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर मंडळाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बीडी सिंह मंगळवारी बद्रीनाथ धाम येथे पोहोचले आणि त्यांनी स्थळाची पाहणी केली. विंटर सिक्युरिटीत तैनात असलेल्या सैनिकांनाही ते भेटले आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मंदिराच्या बाहेरील आवार, तप्तकुंड परिसर, यात्रि निवास, यात्री निवारा, बस स्थानक अशा जागांची पाहणी केली. बद्रीनाथ धामला जाण्यासाठी रस्ते सुस्थितीत असून धाममध्ये अर्धवट बर्फ पडत असल्याची माहिती त्यांनी दिली. धाममधील परिस्थिती सामान्य व सुरक्षित आहे, जेणेकरून वेळेपूर्वी यात्रेची तयारी सुरू करता येईल. (हेही वाचा: Maghi Ganesh Jayanti 2021 Guidelines: माघी गणेश जयंती निमित्त राज्य सरकार कडून मार्गदर्शक सूचना जाहीर, 'या' नियमांचे करावे लागणार पालन)
दरम्यान, भारतामध्ये बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथ पुरी आणि रामेश्वरम हे प्रमुख चारधाम आहेत. याशिवाय बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यांना उत्तराखंडमधील चार धाम समजले जाते.