Buddha Jayanti 2019: बुद्ध जयंती का साजरी केली जाते? काय आहे या दिवसाचे महत्त्व?
यंदा बुद्ध पौर्णिमा शनिवार 18 मे रोजी आहे.
Importance and Significance Of Buddha Purnima 2019: नेपाळमध्ये कपिलवस्तू जवळील लुंबिनी येथे इ. स. पूर्व 563 मध्ये राजा शुद्धोदन आणि राणी मायावती यांना विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव 'सिद्धार्थ' उर्फ 'गौतम' ठेवले. राजकुळात जन्मलेला गौतम नंतर 'गौतम बुद्ध' म्हणून ओळखले जावू लागले. हिंदूधर्मीय गौतम बुद्धांना दशावतरातील नववा अवतार मानतात. यंदा बुद्ध पौर्णिमा शनिवार 18 मे रोजी आहे.
असे घडले गौतम बुद्ध
आपला मुलगा चक्रवर्ती राजा व्हावा, अशी शुद्धोदन राजाची इच्छा होती. मात्र ज्योतिषांनी हा मुलगा धर्म प्रवर्तक होईल, असे भाकीत केले. ज्योतिषाने वर्तवलेले भाकीत खोटे ठरावे म्हणून राजा शुद्धोदन याने एक सुंदर महल बांधला. सुंदर बागा, दास दासी अशा सुखसोयींनी सज्ज अशा बंगल्यात सिद्धार्थला ठेवण्यात आले. तसंच त्याला युद्धकलेचे शिक्षण देण्यात आले. मात्र मुळातच दयाळू असलेल्या सिद्धार्थला हौसेपोटी शिकार करुन प्राण्यांचा जीव घेणे आवडत नसे. त्याचा हा दयाळूपणा विविध कार्यातून डोकावत असे.
सिद्धार्थ मोठा झाल्यावर त्याचा विवाह राजाने यशोधरा नावाच्या सुंदर तरुणीशी करुन दिला. त्यांना राहुल नावाचा एक सुंदर मुलगाही झाला. संसार चालू असताना एके दिवशी सिद्धार्थला रस्त्यात एक भयंकर रोगाने गांजलेला माणूस दिसला. त्यानंतर एका वृद्ध माणसाचे दर्शन झाले आणि शेवटी अंत्ययात्रा पाहायला मिळाली. ही सर्व विदारक दृश्य पाहून सिद्धार्थ मनातून व्यथित झाला. म्हातारपण आणि मृत्यू हे कोणालाही टाळता येत नाही याची त्याला जाणीव झाली आणि मग जीवनाचे ज्ञान करुन घेण्यासाठी सर्व सुखाचा त्याग करुन तो गुपचूप वनात निघून गेला.
प्रथम गुरुंची दीक्षा घेऊन त्याने मनोनिग्रह शिकून घेतला. त्यानंतर 7 वर्ष खडतर तपश्चर्या केली. मात्र इतके करुनही खरे ज्ञान प्राप्त न झाल्याने त्याने तो मार्ग सोडून दिला. नंतर त्याने समाधी लावून ज्ञान प्राप्त केले. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम 'गौतम बुद्ध' म्हणून ओळखले जावू लागले. बुद्धाला ज्या दिवशी ज्ञान प्राप्त झाले तो दिवस म्हणजे वैशाख पौर्णिमा. म्हणून हा दिवस 'बुद्धपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो.
गौतम बुद्धांची शिकवण
आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान लोकांना सांगावे, दुःखापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग त्यांनी जगाला शिकवला. तोच बौद्ध धर्म. या धर्माची शिकवण त्यांनी प्रथम पाच जणांना दिले आणि ते त्यांचे शिष्य बनले.
गौतम बुद्धाने लोकांना 'मध्यम मार्ग' शिकवला. संसारात पुरते बुडून जाणे हे एक टोक आणि जंगलात जावून तपश्चर्या करणे हे दुसरे टोक. ही दोन्ही टोके टाळून चार सत्ये असलेल्या अष्टांग मार्गाने चालणे म्हणजे 'मध्यम मार्ग' होय.
ही चार सत्ये अशी आहेत:
१. संसार दुःखमय आहे.
२. या दुःखाचे मूळ तृष्णा आहे.
३. तृष्णेवर विजय मिळवला की दुःख दूर होते.
४. तृष्णेवर विजय मिळवण्याचा मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग.
जीवनाचे योग्य ज्ञान, सकर्मे करण्याचा निश्चय, मृदू बोलणे, चांगले आचरण, मनाची शांती ढळू न देणे, प्रयत्न व योग्य विचार हा अष्टांग मार्ग आहे.
गौतम बुद्धांनी तब्बल 45 वर्षे धर्म प्रचार केला. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. भारताशिवाय जगभरात बौद्ध धर्माचे अनेक उपासक आहेत. त्यांच्या शिकवणीला, विचारांना, ज्ञानाला उजाळा देण्यासाठी 'बौद्ध पौर्णिमा' साजरी केली जाते.