Anganewadi Jatra 2026 Date: कोकणातील भराडी देवीच्या जत्रोत्सवाची तारीख निश्चित, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण

मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा होणार आहे. आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी परंपरेनुसार देवीला कौल लावून ही तारीख निश्चित केली आहे.

Bharadi Devi Temple Pic Credit:- Anganewadi Temple

मुंबई : कोकणातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि 'नवसाला पावणारी देवी' म्हणून ख्याती असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नवीन वर्षात हा जत्रोत्सव सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा होणार आहे. आंगणे ग्रामस्थ मंडळाने धार्मिक विधी पार पाडत देवीचा कौल घेतल्यावर या तारखेची अधिकृत घोषणा केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही या दीड दिवसांच्या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक येण्याची शक्यता आहे.

'कौल' लावून तारीख निश्चितीची परंपरा

आंगणेवाडीच्या जत्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही जत्रा कोणत्याही तिथीवर किंवा पंचांगावर अवलंबून नसते. दरवर्षी डिसेंबर महिन्यात आंगणे कुटुंबीय आणि मानकरी एकत्र जमून देवीला कौल लावतात. देवीचा हुकूम मिळाल्यावरच यात्रेचा दिवस ठरवला जातो. यंदा ३ डिसेंबर रोजी सकाळी हा विधी पार पडला आणि ९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली.

दहा लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित

आंगणेवाडी जत्रेला 'दक्षिण कोकणची काशी' म्हटले जाते. या उत्सवासाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर गोवा, कर्नाटक आणि परदेशातूनही भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावतात. यंदा या यात्रेसाठी १० लाखांपेक्षा जास्त भाविक येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत असून त्यादृष्टीने प्रशासनाने आणि ग्रामस्थ मंडळाने तयारी सुरू केली आहे.

प्रवासाचे नियोजन आणि विशेष सोयी

जत्रेची तारीख जाहीर होताच कोकणात जाणाऱ्या रेल्वे आणि बसच्या बुकिंगसाठी भाविकांची लगबग सुरू झाली आहे. भारतीय रेल्वे आणि एसटी महामंडळाकडून या कालावधीत विशेष गाड्या सोडण्यात येतात. कुडाळ आणि कणकवली या रेल्वे स्थानकांपासून आंगणेवाडीला जाण्यासाठी रिक्षा आणि बसची नियमित सोय उपलब्ध असते. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी दर्शन रांगा, सुरक्षा आणि निवास व्यवस्था करण्यावर आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ भर देत आहे.

भराडी देवीचे महत्त्व

भरडावर (माळरानावर) ही देवी प्रकट झाली, म्हणून तिला 'भराडी देवी' असे नाव पडले. हे आंगणे कुटुंबीयांचे खाजगी मंदिर असले तरी आज ते लाखो लोकांचे श्रद्धास्थान बनले आहे. नवस पूर्ण झाल्यावर देवीला साडी-चोळी अर्पण करण्याची आणि दर्शन घेण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement