Anganewadi Jatra 2026 Wishes In Marathi: परवा 8 फेब्रुवारीपासून भाविकांची मांदियाळी; भराडी देवी जत्रोत्सवाचे महत्त्व आणि शुभेच्छा

दक्षिण कोकणची काशी मानल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे. या निमित्ताने भाविकांसाठी विशेष रेल्वे गाड्या, शुभेच्छा संदेश आणि उत्सवाच्या तयारीचा आढावा.

आंगणेवाडी जत्रा (Photo Credits-Facebook)

मुंबई: महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी होत आहे. 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यात्रेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आणि आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने जय्यत तयारी केली आहे. यावर्षी सुमारे 8 ते 10 लाख भाविक या दीड दिवसांच्या सोहळ्यासाठी आंगणेवाडीत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कौल लावून निश्चित झाली तारीख

आंगणेवाडी जत्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही जत्रा कोणत्याही विशिष्ट तिथीवर अवलंबून नसते. दरवर्षी डिसेंबर महिन्यात आंगणे कुटुंबीय आणि मानकरी देवीला 'कौल' लावतात. ३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या धार्मिक विधीत देवीचा हुकूम मिळाल्यावरच ९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. प्रथेनुसार, जत्रेच्या दिवशी पहाटे ३ वाजेपासून दर्शनाला सुरुवात होणार असून एकूण १० रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे.

आंगणेवाडी जत्रा भाविकांसाठी शुभेच्छा संदेश

जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. भक्तांसाठी काही खास मराठी संदेश खालीलप्रमाणे आहेत:

"कोकणची काशी, श्री क्षेत्र आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा."

"आई भराडी मातेच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच चरणी प्रार्थना. जत्रोत्सवाच्या शुभेच्छा."

"नवसाला पावणारी आई भराडी देवी, सर्वांना सुखात आणि आनंदात ठेव. आंगणेवाडी जत्रा २०२६ निमित्त मंगलमय शुभेच्छा."

यंदा आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेला तुम्ही मालवण मध्ये कसे पोहचाल

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने मुंबई-मडगाव दरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन जाहीर केली आहे. ट्रेन क्रमांक ०१००३ ही ८ आणि १० फेब्रुवारी रोजी मुंबईहून सुटेल, तर परतीसाठी विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने (ST) कणकवली आणि कुडाळ रेल्वे स्थानकावरून आंगणेवाडीसाठी दर अर्ध्या तासाने जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरक्षा आणि सुविधांवर भर

यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य पथके आणि इंटरनेट सुविधेसाठी तात्पुरते टॉवर्स उभारले गेले आहेत. दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांसाठी ऊन टाळण्यासाठी कापडी सावलीची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement