Anganewadi Jatra 2025 Date: आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा यंदा 22 फेब्रुवारी दिवशी
सिंधुदुर्गात एसटी महामंडळाकडूनही विशेष बस चालवल्या जातात. आता 22 फेब्रुवारीच्या अनुषंगाने देखील विशेष सोय केली जाईल.
कोकणामध्ये भराडी देवीची जत्रा (Bharadi Devi Jatra) यंदा 22 फेब्रुवारीला होणार आहे. कॅलेंडर नव्हे तर देवीला कौल लावून या देवीच्या जत्रेची तारीख ठरवली जात असल्याने या जत्रेकडे कोकणवासियांचं विशेष असतं. यंदाही हा कौल लावण्यात आला होता आणि त्यानुसार, आता फेब्रुवारी महिन्यात आंगणेवाडीची जत्रा (Anganewadi Jatra) होणार आहे.
मालवणामध्ये मसुरे गावातील या आंगणेवाडी जत्रेला मोठ्या संख्येने भाविक देशा-परदेशातून खास दर्शनाला येतात. दीड दिवसाच्या या जत्रेसाठी चाकरमनी हमखास गावात येतात. आजही मसुरे गावात या जत्रेनिमित्त जुने रीती रिवाज सांभाळत सारी जत्रा पार पाडली जाते.
भराड म्हणजे माळरानात देवी प्रकट झाली अशी येथील स्थानिकांची आस्था आहे. या देवीची जत्रा केवळ मालवण गावातील मसुरे गावात असलेल्या बारा वाड्यांपॆकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. या एका आंगणेवाडी नावाच्या वाडी मधील लोकांकडून सिद्धीस नेली जाते. नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती असल्याने मोठ्या संख्येने भाविक या निमित्ताने मालवणात दाखल होतात. (नक्की वाचा: यंदा आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेला तुम्ही मालवण मध्ये कसे पोहचाल?).
दीड दिवसाच्या जत्रेव्यतिरिक्त देखील देवीच्या मंदिरामध्ये लोकं हमखास हजेरी लावून तिचं दर्शन घेतात. ओटी भरतात. जत्रेचं खास वैशिष्ट्यं म्हणजे या दीड दिवसामध्ये आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी महिला अबोल राहून सारा प्रसाद बनवतात. आता कौल लावून तारीख ठरवल्यानंतर संपूर्ण जत्रेच्या तयारीची लगबग सुरू होणार आहे. पुढील धार्मिक कार्यासाठी आज 12 डिसेंबर पासून 14 डिसेंबर पर्यंत मंदिर बंद राहणार आहे. या काळात भाविकांना देवीचं दर्शन घेता येणार नाही.
जत्रेला जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष ट्रेन सोडल्या जातात. सिंधुदुर्गात एसटी महामंडळाकडूनही विशेष बस चालवल्या जातात. आता 22 फेब्रुवारीच्या अनुषंगाने देखील विशेष सोय केली जाईल. सुमारे 10 लाख भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज आहे.