Mrs India Universal 2021 मध्ये पुण्याची Pooja Bhosekar ठरली पहिली उपविजेती

ही स्पर्धा लखनऊच्या ग्रँड जेबीआर येथे आयोजित करण्यात आली होती.

Pooja Ashish Bhosekar (Photo Credits: ANI)

मिसेस इंडिया युनिव्हर्सल 2021 (Mrs India Universal 2021) स्पर्धेत पुण्याची पूजा आशिष भोसेकर (Pooja Ashish Bhosekar) हिने पहिली उपविजेती होण्याचा मान पटकावला आहे. ही स्पर्धा लखनऊच्या (Lucknow ग्रँड जेबीआर (The Grand JBR) येथे आयोजित करण्यात आली होती. युव्हिका चौधरी, प्रिन्स नरुला, करण कुंद्रा, रणविजय सिंह, रोहित खंडेलवाल आणि अनुष्का शर्मा हे कलाकार या स्पर्धेला प्रशिक्षण म्हणून लाभले होते. सुप्रसिद्ध ड्रिम्स प्रॉडक्शन हाऊस कडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

"हा किताब पटकवणे सोपे नव्हते. परंतु, तुम्ही जर तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवलात तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूर्ण झोकून देता. हे स्वप्न पूर्ण करण्यामागे माझे कुटुंबिय आणि ड्रिम्स प्रॉडक्शन हाऊसचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आज मी हा किताब जिंकू शकले," असे पूजा भोसेकर हिने आपल्या प्रवासबद्दल बोलताना सांगितले.

पूजा भोसेकर ही मुळची पुण्याची आहे. पुण्यातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. आशिष भोसेकर हे तिचे पती आहेत. या पूर्ण प्रवासात पूजाला तिच्या पतीची मोलाची साथ लाभली, असेही ती आर्वजून सांगते. पूजा भोसेकर ही स्वत: एक मायक्रोबायोलॉजिस्ट असून त्यांच्या हॉस्पिटलमधील मॅनेजमेंट सांभाळते. 2020 मध्ये ड्रिम्स प्रॉडक्शन हाऊसने आयोजित केलेल्या मिसेस इंडिया युनिव्हर्सल ऑडिशनमध्ये तिने सहभाग घेतला आणि अंतिम फेरीत निवडून आली.

अंतिम फेरीत पुजासह 15 इतर स्पर्धक होते. 27 फेब्रुवारी 2021 रोजी पूजाला मिसेस इंडिया युनिव्हर्सल 2021 च्या पहिल्या उपविजेतीचा किताब मिळाला. यासोबतच तिला मिसेस टॅलेंडेट पुरस्कारही मिळाला. पूजाला चार वर्षांची मुलगी आहे. दरम्यान, सर्व भारतीय महिलांसाठी रोल मॉडल ठरण्याचा पूजाचा मानस आहे. आपण आपली स्वप्न वयाच्या कोणत्याही वर्षी पूर्ण करु शकतो, असा तिचा विश्वास आहे.