या साध्या घरगुती उपायांनी मिळवा त्वचेचा नैसर्गिक उजाळा आणि ग्लो
यासाठी फक्त घराबाहेर पडतानाच नाही तर दिवसभरातही आपण आपल्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.
पुरुष असो वा स्त्री प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. मात्र घराबाहेर पडल्यानंतर हवेतील अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो, मग तो सूर्यप्रकाश असो वा थंडी. अशावेळी त्वचा कधी डॅमेज होते हे समजतही नाही. त्वचा काळवंडने अथवा कोरडी पडण्याचे प्रकार तर नेहमीच घडत असतात. यासाठी फक्त घराबाहेर पडतानाच नाही तर दिवसभरातही आपण आपल्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर पाहूया सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी पुरुष आणि स्त्री अशा दोहोंचे रोजचे स्कीन केअर रुटीन काय असायला हवे.
> सकाळी उठल्याबरोबर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. त्यानंतर शक्य असल्यास टोमॅटो अथवा कोरफडीचा गर अथवा जेलने चेहऱ्याला हलका मसाज करा.
> आंघोळीच्या पाण्यात मीठ घालून, शक्यतो कोमट पाण्याने आंघोळ करा. चेहऱ्यासाठी साबणाऐवजी फेसवॉशचाचा वापर करा. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉश निवडा. चेहऱ्यावरील ड्राय स्कीन काढून टाकण्यासाठी तुम्ही स्क्रबदेखील वापरू शकता. परंतु स्क्रबिंग अगदी कमी प्रमाणातच करायला हवे कारण रोज स्क्रबिंग केल्याने तुमची त्वचा कोरडी होवू शकते.
> अंग कोरडे केल्यावर हलक्या हाताने मॉयश्चरायझर लावा. मॉयश्चरायझर विकत घेताना SPF चेक करूनच घ्या. शक्यतो जास्त SPFचे मॉयश्चरायझर वापरा
> त्यानंतर चेहऱ्याला टोनर लाऊन तुम्ही मेकअप चढवू शकता. गुलाब पाण्याचाही तुम्ही टोनर म्हणून वापर करू शकता. पुरुष त्वचेवर टॅन चढणार नाही अशी एखादी क्रीम वापरू शकतात.
> घराबाहेर पडल्यानंतर स्कीनचा जो भाग थेट सुर्याच्या किरणांच्या संपर्कात येणार आहे, त्या ठिकाणी सनस्क्रीन क्रिम लावूनच घराबाहेर पडा.
> दिवसभरामध्ये कमीत कमी 2 तासांच्या अंतराने आपली बॉडी आणि चेहऱ्याला मॉयश्चरायझर लावा. शुष्क त्वचेला वेळोवेळी हायड्रेट ठेवण्यास याची मदत होईल.
> चेहऱ्यासोबत ओठांचीही काळजी घेणे फार महत्वाचे आहे. यासाठी चांगल्या लिप बामचा वापर करा. मधामध्ये थोडी साखर टाकून हा स्क्रब ओठांवर चोळा. यामुळे ओठांवरील डेड स्कीन निघून जाते.
> दिवसभरात अधिकाधिक पाणी प्या, फळे खा
> रात्री झोपतानाही मेकअप काढून, फेसवॉश अथवा गुलाब पाणी किंवा टोनरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. झोपताना चेहऱ्याला मॉयश्चरायझर अथवा एक चांगली नाईट क्रिम लावा, जी रात्री तुमच्या त्वचेला मायश्चराइझ करेल. अथवा कोरफडीचे जेल देखील लावून झोपू शकता. रात्री स्कीनसाठी केलेला कोणताही उपाय फार परिणामकारक ठरतो.
फेसपॅक
आठवड्यातून एकदा अथवा शक्य असल्यास दोनवेळा न चुकता फेसपॅकचा वापर करा. हा फेसपॅक तुम्ही घरीदेखील बनवू शकता.
थोडी मुलतानी मिट्टी, मध, गुलाबपाणी, थोडी दुधावरची साय, थोडी हळद, १ चमचा लिंबू रस अथवा दही हे सर्व पदार्थ एकत्र करून चांगले मिश्रण करून घ्या आणि ब्रशच्या सहाय्याने चेहरा आणि मानेवर लावा. साधारण 15 मिनिटांमध्ये हा लेप सुकेल, त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. (हा लेप जास्त वेळ चेहऱ्यावर ठेऊ नका. मुलतानी मिट्टी कोरडी असल्याने ती त्वचेला अजून ड्राय करू शकते)
या फेसपॅकमुळे फक्त ड्राय स्कीनचीच समस्या दूर होत नाही तर नैसर्गिक उजाळा मिळवण्यासाठीही याचा फायदा होईल.