पावसाळ्यात आपल्या जोडीदारासह चिंब भिजण्यासाठी महाराष्ट्रातील काही हटके ठिकाणे
महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य असेल, जिथे उत्तम समुद्रकिनारा, पर्वत व किल्ले, घाट, पठार असा सर्व प्रकारच्या निसर्गाच्या छटा आढळतात
Places To Visit In Monsoon: गेले काही महिने उन्हाची काहिली सहन केल्यानंतर आता झालेले पावसाचे आगमन हे अतिशय सुखावह आहे. अशा वेळी सर्वांना वेध लागतात ते बाहेर फिरायला जाण्याचे. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत किंवा कुटुंबासोबत पावसाळ्यात बाहेर फिरायला जाण्याची मजा काही औरच आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील काही हटके ठिकाणांची माहिती देणार आहोत ज्याला तुम्ही पावसाळ्यात भेट देऊ शकता. महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य असेल, जिथे उत्तम समुद्रकिनारा, पर्वत व किल्ले, घाट, पठार असा सर्व प्रकारच्या निसर्गाच्या छटा आढळतात. त्यात पावसाळ्यातील महाराष्ट्र म्हणजे जणू काही स्वर्गच..
माळशेज घाट - नगर-कल्याण रस्त्यावरील माळशेज घाट हा मुसळधार पावसातील भिजण्यासाठीचे अप्रतिम ठिकाण आहे. अगदी हात उंचावला तर हातात ढग येण्याची शक्यता या घाटात दिसते. या घाटातून दूरवर पसरलेल्या दऱ्यांचा नजरा पाहणे काही औरच. म्हणूनच फोटोग्राफर्स लोकांची ही अतिशय आवडती जागा आहे. माळशेजघाटा आधी मुरबाडजवळ असणारा पळूचा धबधबा हे एक उत्तम स्थळ आहे, जवळच हरिश्चंद्र गडही आहे.
दापोली – दिवेआगर – वेळास – हे महाराष्ट्रातील काही निसर्गरम्य, निवांत असणारे, स्वच्छ आणि कमी गर्दीचे समुद्रकिनारे. पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. ही तीनही थकणे कोकणात असल्याने या ठिकाणी जायचा रस्तादेखील पावसाळ्यात तितकाच नयनरम्य असतो.
चिखलदरा - सातपुडा पर्वतरांगेत तब्बल एक हजार मीटर उंचीवर असलेले चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. खोल दऱ्या, धबधबे, दूरवर पसरलेले हिरवे गालिचे, धुक्याची दुलई असे चित्र इथे पावसाळ्यात पाहायला मिळते. भटकंतीसाठी देवी पॉईट, पंचबोल पॉईट. वॉटर बोटींग व दुचाकीवरून मस्त फिरण्यासाठी भीम कुंड, वन उद्यान, या परिसरातील लोकांनी तयार केलेल्या वस्तूंचे संग्रहालय ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. येथील कॉफिचे मळेही पहाण्यासारखे आहेत.
इगतपुरी – हे ठिकाण समुद्रसपाटीपासून उंच असल्याने इथे वर्षभर आल्हाददायक वातावरण असते. त्यात पावसाळ्यात इगतपुरीला भेट देणे याहून अधिक सुख ते काय? इगतपुरी तालुक्याला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. भरपूर वनसंपदा आणि जलसंपदा असल्याने प्रत्येकाला निसर्ग अगदी जवळून अनुभवायला मिळतो. भातसा नदीचे पात्र, आर्थर लेक, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, गिरीसागर फॉल्स, कॅमल व्हॅली, त्रिनगलवाडी फोर्ट, थाल घाट, म्यानमार गेट, भावली डॅम, अशोका फॉल्स, घाटनदेवी माता मंदिर ही ठिकाणे इगतपुरीचे आकर्षण आहे.
भंडारदरा – पावसाळ्यात दोन दिवसांचा ट्रीपसाठी पुणे आणि मुंबईहून जाण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील, भंडारदरा हे अगदी योग्य ठिकाण आहे. पावसाळ्यात इथे काजवा मोहत्सव भरतो. निसर्ग सौंदर्याने नटलेले हे स्थान, इथले धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा जागेच्या मूळ सौंदर्यात अजूनच भर टाकतात.
भीमाशंकर – पुण्यातील जिल्ह्यात असणारे भीमाशंकर हे घनदाट अरण्याने समृध्द असे ठिकाण आहे. भीमा नदीचा उगमही याच अरण्यातून होतो. हे ठिकाण उंचावर असल्याने पावसाळ्यात अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे सौंदर्य निसर्गाने इथे उधळलेले असते. येथील गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सितारामबाबा आश्रम, नागफणी इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.