Coronavirus: पुण्यातील NIV ने विकसित केली Antibody Detection kit; अडीच तासांमध्ये होणार 90 नमुन्यांची चाचणी

कोरोना विषाणू (Coronavirus) द्वारे देशावर फार मोठे संकट ओढवले आहे, देशात रोज हजारोंच्या संख्येने कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे पाहायला मिळत आहेत.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणू (Coronavirus) द्वारे देशावर फार मोठे संकट ओढवले आहे, देशात रोज हजारोंच्या संख्येने कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे पाहायला मिळत आहेत. अशात कोरोना विषाणूच्या चाचणीसंदर्भात भारताने मोठे यश संपादन केले आहे. भारताने कोविड-19 अँटीबॉडी शोध चाचणी किट विकसित केले आहे. पुण्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (National Institute of Virology) ने कोविड-19 च्या प्रतिपिंडे शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी इलिसा  (IgG ELISA) चाचणी विकसित केली आहे, ज्याला कोविड कवच एलिसा चाचणी असे नाव देण्यात आले आहे. एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने असलेल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा तपास करण्यासाठी हे किट महत्वाची भूमिका बजावेल.

या चाचणी किटचा फायदा म्हणजे, 2.5 तासांमध्ये एकाचवेळी 90 नमुन्यांची चाचणी घेण्यात येऊ शकणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी ही माहिती दिली. या किटला मुंबईत दोन ठिकाणी वापरण्याची परवानगी देण्यात आली असून, त्याचे निकाल समाधानकारक असल्याचे हर्षवर्धन म्हणाले. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत हे किट तयार करण्यात आले आहे. या चाचणी किटच्या मदतीने, शरीरात सार्स-सीओव्ही-2 रोधक अँटी बॉडी शोधण्यास मदत होईल.

आता हे चाचणी किट मोठ्या प्रमाणात तयार केली जाईल, यासाठी आयसीएमआरने एलिसा चाचणी किटच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी झाइडस कॅडिला (Zydus Cadila) बरोबर भागीदारी केली आहे. (हेही वाचा: भारतात कोणत्या राज्यात किती आहे कोरोना संक्रमित रुग्ण, पाहा आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर)

दरम्यान, जर एखादी व्यक्ती एखाद्या विषाणूचा बळी पडली असेल तर व्हायरसशी लढण्यासाठी त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार केले जातात. शरीरातील अँटीबॉडी शोधण्यासाठी जलद चाचण्या आवश्यक असतात, यावरून शरीरारात कोणताही विषाणूआहे की नाही याचा शोध लावला जाऊ शकतो. कोरोना विषाणूचा संसर्ग शोधण्यासाठी सध्या रिअल टाईम पीसीआर टेस्ट (RTPCR) केली जाते.