Akshaya Tritiya 2024 Date and Time: जाणून घ्या यंदा कधी आहे अक्षय्य तृतीया; तारीख, वेळ आणि मुहूर्त
अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताचा विचार करावा लागत नाही.
Akshaya Tritiya 2024 Date and Time: हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2024) हा सण साजरा केला जातो. शास्त्रात अक्षय्य तृतीयेला युगादि तिथी म्हटले आहे. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते, तसेच अक्षय्य तृतीयेच्याच दिवशी भगवान परशुराम यांचा अवतार झाला होता अशीही मान्यता आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. यंदा अक्षय्य तृतीया हा सण शुक्रवार, 10 मे 2024 रोजी साजरा होणार आहे.
हिंदू मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेची तारीख अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताचा विचार करावा लागत नाही. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा ज्याचा कधीही नाश होत नाही. धार्मिक श्रद्धेनुसार या शुभ दिवशी केलेले दान, पूजा, जप आणि शुभ कर्माचे अक्षय फळ मिळते. या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करून लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.
तिथी-
यावर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी शुक्रवार, 10 मे रोजी पहाटे 4.17 वाजता सुरू होईल व शनिवारी, 11 मे रोजी सकाळी 02:50 पर्यंत वैध असेल. उदयतिथीच्या मुहूर्तावर येत्या शुक्रवारी, 10 मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे.
मुहूर्त-
यंदा 10 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 05.33 पासून सुरू होतो आणि दुपारी 12.18 वाजता समाप्त होतो. त्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त 6 तास 44 मिनिटे आहे.
याच दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले असेही समजले जातात. (हेही वाचा: Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' खास टिप्स; अन्यथा होऊ शकते तुमची फसवणूक)
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची पूजा करावी. यामुळे कुटुंबात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि समृद्धी वाढते आणि शाश्वत राहते. तसेच अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही सोने, चांदी, दागिने इत्यादी खरेदी करू शकता. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घर, प्लॉट, जमीन, फ्लॅट, वाहन इत्यादी गोष्टींची खरेदीही फलदायी ठरते. अक्षय्य तृतीयेला विवाह, मुंज असे विधी केले जातात. या दिवशी कोणत्याही तीर्थक्षेत्री आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध आणि तर्पण करणे अत्यंत शुभ आहे.
(टीप- हा लेख इंटरनेट आधारित माहितीवर लिहिला आहे. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही)