Corona Vaccine: कोविशिल्डबाबत डब्लूएचओकडून सतर्कतेचा इशारा, लस घेण्याआधी 'ही' बातमी नक्की वाचा
दरम्यान, जगभरात लसीकरण (Vaccination) मोहिम राबवली जात आहे.
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातले आहे. दरम्यान, जगभरात लसीकरण (Vaccination) मोहिम राबवली जात आहे. भारतात कोविशिल्ड (Covishield), कोवॅक्सिन ( Covaxin), मॉडर्ना (Moderna), स्पुतनिक व्हीसह (Sputnik V ) नुकतीच परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson and Johnson) या लसी नागरिकांना दिल्या जात आहे. याचपार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोविशिल्ड लसीबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. भारत आणि युगांडामध्ये कोविशिल्डच्या बनावट लसी आढळून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. सिरम इन्स्टिट्युटने (Serum Institute Of India) या बातमीला दुजोरा दिला आहे. कोविशिल्डच्या बनावट लसींमुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
भारतात कोविशिल्ड लसीच्या 2 एमएलच्या वायसल्स आढळून आल्या आहेत. मात्र, सिरम इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्डच्या 2 एमएलच्या वायल्स तयारच केल्या जात नाहीत. याचदरम्यान, युगांडात एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या कोविशिल्ड लसींची एक बॅच आढळली आहे. यामुळे नागरिकांनी अधिक जागरूक राहण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. तसेच या लसी नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात. या बनावट लसी तातडीने शोधून काडून हटवणे हे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे, असेही जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अधिकृत वेबसाईटमध्ये नमूद केले आहे. हे देखील वाचा- COVID-19 Vaccination for Children: लहान मुलांच्या लसीकरणाबाबत नीति आयोगाच्या आरोग्य आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली महत्वाची माहिती, पहा व्हीडिओ
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी (16 ऑगस्ट) रोजी लसीकरण मोहिमेअंतर्गत 88 लाख 13 हजार 919 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात पहिला आणि दुसऱ्या दोन्ही डोसचा समावेश आहे. भारतात सोमवारपर्यंत 55 कोटी 47 लाख 30 हजार 609 लसीकरण झाले आहे. त्यापैकी 43 कोटी 11 लाख 94 हजार 809 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 12 कोटी 35 लाख 35 हजार 800 लोकांना दोन्ही देण्यात आले आहे.