उत्तर प्रदेश: कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या भीतीपोटी 35 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

उत्तर प्रदेशातून ही धक्कादायक घटना समोर येत आहे. सर्दी खोकला झाल्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत त्याने आत्महत्या केली.

Suicide (Photo Credits: Pixabay, Open Clip Art)

कोरोना व्हायरसचे संकट सध्या देशावर घोंगावत आहे. हळूहळू कोरोनाने आपले दाहक स्वरुप दाखवायला सुरुवात केली आहे. या संकटाच्या धास्तीने अनेकजण अस्वस्थ आहे. दरम्यान, सर्दी-खोकला झालेल्या एका 35 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांडा (Banda) जिल्हातील जमलपूर (Jamalpur) गावात आपल्या राहत्या घरी गळफास घेत त्याने आत्महत्या केली. कोरोनाच्या भीतीने त्याने आपले जीवन संपवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सर्दी, खोकला झाल्याने गावातील लोका त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे मानत त्याच्याकडे संशयाने पाहू लागले. त्यानंतर त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले, अशी माहिती मृताच्या नातेवाईकांनी दिली आहे. आत्महत्या केलेली व्यक्ती दिल्लीत गवंडी कामगार म्हणून कार्यरत होती. दिल्लीहून मार्च महिन्यात परतल्यानंतर तो अनेक दिवसांपासून सर्दी-खोकल्याने त्रस्त होता. तसंच त्याला अधूनमधून तापही येत होता. (उत्तर प्रदेश येथे कोरोना विषाणूच्या भीतीपोटी एका सरकारी कर्मचाऱ्याची कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या)

वैद्यकीय अधिकारी संतोष कुमार यांनी सांगितले की, "लक्षणे आढळल्यानंतर तो कोणत्याही सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी गेला नाही." मात्र त्याने कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

यापूर्वी कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोरोनाचे संकट भयंकर असले तरी त्याबद्दलची जनजागृती विविध माध्यमातून होत आहे. तसंच आरोग्य यंत्रणाही कार्यरत आहे. त्यामुळे भीतीपोटी जिवन संपवणे हा मार्ग नाही. तसंच या काळात शारीरिक तंदुरुस्ती सोबत मानसिक स्वास्थ्य जपणेही आवश्यक आहे.