UP Heatwave Death: सूर्य ओकतोय आग! निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उष्माघाताने 33 निवडणूक कार्मचाऱ्यांचा मृत्यू

मृतांमध्ये होमगार्ड, स्वच्छता कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Photo Credit -X

UP Heatwave Death: उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान पार पडले. या दरम्यान, एका दिवसात 33 निवडणूक कार्मचाऱ्यांचा ( Election Workers Death) मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या देशभरात उष्णतेची लाट (Heatwave)आहे. उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी तापमानाचा पारा नोंदवला गेला. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागात मोठी जिवीतहानी झाली. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) नवदीप रिनवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 13 मतदारसंघांमध्ये शनिवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात उष्माघातामुळे 33 निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू (Heatwave Death)झाला आहे. या मृतांमध्ये होमगार्ड, स्वच्छता कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

त्याशिवाय, बलिया लोकसभा मतदारसंघात सिकंदरपूर भागातील एका बूथवर एका मतदाराचाही मृत्यू झाला, असे नवदीप रिनवा म्हणाले. राम चौहान असे मतदाराचे नाव होते. मतदान केंद्रावर उभे असताना राम चौहान बेशुद्ध पडले आणि त्यांना तातडीने आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे ते म्हणाले.

या घटनेनंतर राज्यातील सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना संबंधित मतदारसंघातील मतदान कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे सीईओ रिनवा यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने, मृत निवडणूक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 15 लाखाची भरपाई दिली जाईल, असे ते म्हणाले.

लखनऊमध्ये रमाबाई आंबेडकर मैदानावर ईव्हीएमच्या सुरक्षारक्षकाचा म्हणजेच कॉन्स्टेबलचा शनिवारी मृत्यू झाला. जेसीपी (कायदा व सुव्यवस्था) उपेंद्र अग्रवाल यांनी कॉन्स्टेबलच्या मृत्यूची पुष्टी केली. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणूकीच्या सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, बांसगाव (SC), घोसी, सलेमपूर, बलिया, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर आणि रॉबर्टसगंज (SC) येथे मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने या टप्प्यात मतदानासाठी १,०८,३४९ मतदान कर्मचारी तैनात केले होते.