Heavy Rain in Assam: आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती; भूस्खलनात 3 जणांचा मृत्यू

दिमा हासाओमध्ये, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे नुकसान झाले आहे.

Heavy Rain in Assam (PC - ANI)

Heavy Rain in Assam: आसाममधील संततधार पावसामुळे दिमा हासाओच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. असानी चक्रीवादळ (Asani Cyclone) सुरू झाल्यापासून आसाममध्ये सतत पाऊस पडत आह. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. पाणी साचल्याने हजारो लोकांचे हाल झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, सततच्या पावसामुळे दिमा हासाओ जिल्ह्यातील 12 गावांमध्ये भूस्खलन झाल्याची नोंद आहे. हाफलांग भागात जवळपास 80 घरे बाधित झाली आहेत. दिमा हासाओ जिल्ह्यातील हाफलांग भागात भूस्खलनात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला. भारतीय लष्कराच्या जवानांनी काल रात्री कछार जिल्ह्यातील बालीचरा आणि बारखोला या पूरग्रस्त भागात बचाव कार्य केले.

दिमा हासाओमध्ये, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील हाफलांग भागात रस्ता वाहून गेला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, कचर, धेमाजी, होजाई, कार्बी आंगलाँग पश्चिम, नागाव आणि कामरूप (मेट्रो) या सहा जिल्ह्यांतील 94 गावांतील एकूण 24,681 लोकांना पुराचा फटका बसला आहे. (हेही वाचा - क्रूझ पर्यटनावरील सर्वोच्च स्तरावरील समितीला मदत करण्यासाठी उच्चस्तरीय सल्लागार समितीची घोषणा)

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या असून, मायबांग ते माहूर दरम्यानच्या रेल्वे मार्गावर परिणाम झाला आहे. परिणामी गाड्या उशिराने धावत आहेत. याव्यतिरिक्त, ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) च्या लुमडिंग-बदरपूर विभागात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, संततधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) च्या लुमडिंग-बदरपूर सेक्शनमध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे लुमडिंग विभागातील लुमडिंग-बदरपूर टेकडी विभागातील अनेक भागात पाणी साचल्याने अनेक गाड्या रद्द किंवा अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

आसाम आणि मेघालयमध्ये ऑरेंज अलर्ट जारी -

भारतीय हवामान खात्याने 15 तारखेपर्यंत आसामच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आसाम, मेघालय आणि अरुणाचलमध्ये 15 मेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, बंगालच्या उपसागरातील नैऋत्य वाऱ्यांचा मोठा प्रभाव खालच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रावर दिसून येत आहे. तेलंगणा, अरुणाचल, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि मिझोराममध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर आसाम आणि मेघालयमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.