पंतप्रधानांच्या तामिळनाडू दौऱ्याविरुद्ध सोशल मिडियावर आंदोलन; #GoBackModi हॅशटॅग ट्रेंडमध्ये

ट्विटवर गो बॅक मोदी #GoBackModi हा हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे.

नरेंद्र मोदी तामिळनाडू दौरा (File Image)

नरेंद्र मोदीं (Narendra Modi) ची लोकप्रियता बाहेर कितीही वाढो मात्र दक्षिण भारतातील काही राज्ये अजूनही मोदींचा स्वीकार करू शकले नाहीत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी पक्षांनी तयारी सुरु केली आहे. यासाठी पंतप्रधान आज तामिळनाडू (Tamil Nadu) च्या दौऱ्यावर आहेत, मदुराईसोबतच ते ऑल इंडिया इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सच्या (AIIMS) इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यासाठी थोप्पुरला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथील जनतेने सोशल मिडीयावर मोदींविरुद्ध आंदोलन पुकारले आहे. ट्विटवर गो बॅक मोदी #GoBackModi हा हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे. मोदींच्या दौऱ्याला स्थानिक नागरिक, अनेक पुढारी, डावे पक्ष यांचा प्रखर विरोध आहे.

ट्विटरवर गेल्या 12 तासांपासून #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. शनिवारी रात्रीपासून हा हॅशटॅग वापरण्यास सुरुवात झाली. केंद्र सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत हा राग लोकांच्या मनात आहे. सायक्लोनमुळे कित्येक जिल्ह्यातील 3 लाखाहून अधिकजण बेघर झाले आणि 11 लाखाहून झाडेही वाहून गेली. मात्र केंद्र सरकारची मदत जनतेपर्यंत पोहोचलीच नाही या मुद्द्यावरून मोदींच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात येत आहे. (हेही वाचा : पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी कायदा धाब्यावर, 1000 झाडांची बेकायदा कत्तल करुन हेलिपॅड निर्मिती)

यापूर्वीही एप्रिल 2018 मध्ये मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर असताना अशाचा विरोधाचा सामना मोदींना करावा लागला होता. त्यावेळीही विरोधकर्ते काळे झेंडे घेऊन मोदींविरोधात रस्त्यावर उतरले होते. दरम्यान या पाठोपाठ आता मोदी समर्थकांनीही #TNWelcomesModi असा ट्रेंड ट्विटरवर सुरू केला आहे.