Delhi Schools Bomb Threat: दिल्लीतील 3 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
त्यानंतर शाळा रिकामी करण्यात येत असून शाळेच्या परिसराची कसून चौकशी करण्यात येत आहे.
Delhi Schools Bomb Threat: राजधानीतील अनेक शाळांना धमकीचे मेल आले आहेत, ज्यामध्ये शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीतील द्वारका येथे असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलला (डीपीएस) बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पूर्व दिल्लीतील मयूर विहार येथील मदर मेरी स्कूलमध्येही बॉम्बची धमकी मिळाली आहे. तसेच संस्कृती शाळेलाही असाच मेल आला आहे. दिल्ली पब्लिक स्कूल, नोएडालाही धमकीचा मेल आला आहे. त्यानंतर पोलीस आणि शाळा प्रशासन सतर्क झाले. खबरदारी म्हणून मुलांना बाहेर काढण्यात आले.
पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलला धमकीचा मेल आला आहे, ज्यामध्ये शाळेत बॉम्ब असल्याचे सांगण्यात आले आहे. खबरदारी म्हणून शाळा रिकामी करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली पोलीस, बॉम्ब निकामी पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. शोध सुरू आहे. मात्र, पोलिसांना अद्याप काहीही सापडलेले नाही. (हेही वाचा - Bomb Threat Emails: जयपूर, नागपूर, गोवा विमानतळांवर बॉम्बच्या धमकीचे ईमेल; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर)
मदर मेरी स्कूलमध्ये धमकीचा मेल -
पूर्व दिल्लीतील मयूर विहार येथे असलेल्या मदर मेरी स्कूलमध्ये बॉम्बची धमकी देणारा ईमेल आज सकाळी आला होता. त्यानंतर शाळा रिकामी करण्यात येत असून शाळेच्या परिसराची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याचवेळी आज सकाळी संस्कृती शाळेत बॉम्बच्या धमकीचा ईमेल आला. शाळेच्या परिसराची सखोल चौकशी करण्यात येत आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
दुसरीकडे, दिल्ली पब्लिक स्कूल, नोएडाला एक ईमेल प्राप्त झाला आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. खबरदारी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना तातडीने घरी पाठवत आहोत. अशी माहिती शाळेने दिली आहे.