कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला 2 वर्षांचा पगार देणार 'ही' कंपनी; मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलणार
कंपनीच्या नव्या पॉलिसीनुसार, मृत कर्मचार्याच्या कुटूंबाला 24 महिन्यांपर्यंत 2 लाख रुपयांपर्यंतचे मासिक वेतन, दोन मुलांना बारावीपर्यंत प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये शैक्षणिक सहाय्य आणि पदवीसाठी, दर मुलाला वर्षाकाठी 5 लाख रुपये दिले जातील.
भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहेत. ग्रामीण भागात तसेच शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील औद्योगिक क्षेत्राने मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, दुचाकी आणि तीन चाकी वाहन बनवणाऱ्या ऑटो कंपनी बजाज (Bajaj Auto) ने आपल्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास पुढील 2 वर्ष पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त मृत कर्मचार्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही कंपनी उचलणार आहे. पुणेस्थित ऑटो कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने दिलेला वैद्यकीय विमा देखील 5 वर्षांसाठी वाढविण्यात येईल. बजाज ऑटोने देऊ केलेल्या इतर जीवन विम्याच्या फायद्यांपेक्षा हे फायदे जास्त आहेत.
कंपनीच्या नव्या पॉलिसीनुसार, मृत कर्मचार्याच्या कुटूंबाला 24 महिन्यांपर्यंत 2 लाख रुपयांपर्यंतचे मासिक वेतन, दोन मुलांना बारावीपर्यंत प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये शैक्षणिक सहाय्य आणि पदवीसाठी, दर मुलाला वर्षाकाठी 5 लाख रुपये दिले जातील. बजाज ऑटोने सांगितले की, ही मदत सर्व स्थायी कर्मचार्यांना 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. (वाचा - COVID-19 In India: भारतात मागील 24 तासांत 3,62,727 जणांना कोरोनाचे निदान; 4,120 जणांनी गमावले जीव)
बजाज ऑटोने म्हटले आहे की, कर्मचारी केंद्रित संस्था म्हणून आम्ही आमच्या सर्व कर्मचार्यांना विविध उपाययोजना व पुढाकारांद्वारे सतत पाठिंबा देत राहू, जे फक्त लसीकरण केंद्रेपुरते मर्यादित नाही तर कोविड केअर सर्व्हिस, प्रोएक्टिव टेस्टिंग, हॉस्पिटेलाइजेशन असिस्टेंस सुविधा पुरवत आहेत.
त्यापूर्वी Borosil Limited आणि Borosil Renewables Ltd कंपनीने आपल्या कर्मचार्यांसाठी असे सहाय्य धोरण आणले होते. मुंबईस्थित ग्लासवेअर कंपनीने कोविडमुळे जीव गमावलेल्या आपल्या कर्मचार्याच्या कुटुंबाला पुढील दोन वर्षे पगार मिळणार असल्याचं म्हटलं होतं. याशिवाय त्या कर्मचार्यांना ज्या सुविधा मिळत होत्या, त्या सर्व सुविधा त्याच्या कुटुंबियांना मिळतील, असंही कंपनीने सांगितलं होतं.