मावळत्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा; हे आहेत तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
आता मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान येथे कोण नवीन मुख्यमंत्री येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
झालेल्या विधानसभा निवडणुकीमधील कॉंग्रेसचा विजय वाखाणण्याजोगा आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यात बहुमत प्रस्थापित करणे ही फार मोठी गोष्ट राहुल गांधी यांनी केली आहे. आता या पाचही राज्यांतील सत्तास्थापनेचा वेग वाढत आहे. तेलंगणा आणि मिझोरम येथील मुख्यमंत्र्यांची घोषणा आधीच झाली आहे. तेलंगणामध्ये जुनाच पक्ष सत्ता स्थापन करणार आहे तर मिझोरममध्ये झोरमथंगा (Zoramthanga) हे सत्ता आपल्या हाती घेणार आहेत. आता मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान येथे कोण नवीन मुख्यमंत्री येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे कॉंग्रेसला बहुमतासाठी मायावतींनी पाठींबा दर्शवला आहे. यातच नरेंद्र सलुजा (Narendra Saluja) यांनी कॉंग्रेसने मध्यप्रदेश राज्यपालांची भेट घेतली असून, आपल्याकडे 122 जागांचा पाठींबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे लवकरच या तीनही राज्यांमध्ये कॉंग्रेसचे नवे मुख्यमंत्री सत्तारूढ होतील.
राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट अशी दोन नावे चर्चेत आहेत. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हे दोघेही स्वतःच्या विभागातून चांगल्या मताधिक्क्यांनी निवडून आले आहेत. गेहलोत यांनी यापूर्वीही राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. तर सचिन पायलट यांनी अजमेर आणि अलवर या दोन्ही लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. त्यामुळे आता राहुल गांधी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मावळत्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपला पराभव मान्य करत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपविला आहे. (हेही वाचा : BJP ची लाट का ओसरली? जाणून घ्या)
मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया दोघे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार समजले जात आहेत. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वीच कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष बनवले होते, तर ज्योतिरादित्य सिंधियांना कॅम्पेन कमिटीचे अध्यक्षपद दिले होते. मात्र राहुल गांधी यांच्या प्रचारसभेत कमलनाथ यांचे योगदान अधिक होते. त्यांच्यामुळेच मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेस विजयी झाले असे बोलले जात आहे. म्हणून कमलनाथ हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे. बसपने कॉंग्रेसला समर्थन दिल्याने काँग्रेसचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मावळते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राजीनामा दिला आहे.
छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजपचे रमण सिंह हे मुख्यमंत्री होते. आता काँग्रेसची सत्ता येणार हे निश्चित झाल्यावर छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये भूपेश बघेल, टीएस सिंहदेव, ताम्रध्वज साहू, डॉ. चरणदास महंत यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. मावळते मुख्यमंत्री रमन सिंग यांनीदेखील कालच आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपविला आहे.
तेलंगणा राज्यात तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असे सूत्रांकडून समजत आहे. 119 सदस्यांच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत टीआरएसने तब्बल 88 जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला आहे.