Swiggy 1.5 वर्षात 3 लाख रोजगार संधी उपलब्ध करण्याच्या तयारीत; संस्थापक श्रीहर्ष मजेठी यांचं विधान
असे झाल्यास शारीरिक श्रमाचे रोजगार थोडक्यात ब्लु कॉलर जॉब देणारी 'स्वीगी' ही एकूणच देशातील तिसरी तर खासगी क्षेत्रातली सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे.
घराघरात पोचून क्षुधा शांतीचं कार्यहाती घेतलेल्या 'स्वीगी' (Swiggy) ही ऑनलाईन होम डिलिव्हरी करणारी कंपनी 1.5 वर्षात 3 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या तयारीत आहे. असे झाल्यास शारीरिक श्रमाचे रोजगार थोडक्यात ब्लु कॉलर जॉब देणारी 'स्वीगी' ही एकूणच देशातील तिसरी तर खासगी क्षेत्रातली सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे.
स्वीगीची व्यवसाय वाढ अशीच राहिल्यास लवकरच आमची कंपनी सैन्यदल (Army) आणि रेल्वेनंतर (Indian Railway) रोजगार उपलब्ध करून देणारी तिसरी कंपनी ठरेल, असे विधान स्वीगीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले श्रीहर्ष मजेठी (Sriharsha majety) यांनी केले. भारतामध्ये सैन्यदल आणि रेल्वे या पहिल्या दोन नंबरच्या कंपन्या आहेत. मार्च 2018 पर्यंत सैन्यदलात 12.5 लाख तर रेल्वेमध्ये 12 लाख कर्मचारी कार्यरत होते. तर या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही खासगी संस्था 4.5 लाख कर्मचाऱ्यांसह तिसऱ्या स्थानी होती. तिन्ही कंपन्या कर्मचाऱ्यांना एम्प्लॉयी बेनेफिट्स आणि स्थायी नोकऱ्या पुरवतात. पण स्वीगीकडून पुरवण्यात येणाऱ्या ब्लु कॉलर जॉब मध्ये कर्मचाऱ्याला त्याच्या कामाच्या प्रमाणात मानधन मिळते. स्वीगीकडे दोन लाखांपेक्षा जास्त कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. दिड वर्षात लाख कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाल्यास एकूण कामगारसंख्या 5 लाखाच्या वर जाईल. (हेही वाचा. महाराष्ट्रात स्थानिकांना ८० टक्के रोजगार धोरण नाकारणाऱ्या उद्योगांचे जीएसटी, अन्य करांचे परतावे रोखणार: सुभाष देसाई
सध्या स्वीगीकडे 2.1 लाख कर्मचारी फूड डिलिव्हरी करणारे आहेत, तर 8000 कर्मचारी हे पेरोलवर आहेत. पेरोल वर नसल्या कारणाने डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोविडेंट फंड सारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. महिन्यातून किमान एक लॉग इन करणाऱ्या कर्मचाऱ्याला स्वीगी ऍक्टिव्ह कर्मचारी मानते.