Bihar: एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने समस्तीपूरमध्ये खळबळ; कर्जामुळे संकटात सापडला होता परिवार

मात्र, कर्जाचा हप्ता भरण्यास ती असमर्थ होती. पैसे देण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता. याच दबावाखाली मनोज आणि त्याच्या कुटुंबीयांनी गळफास घेतला असावा, असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

Bihar: बिहारमधील समस्तीपूर (Samastipur) मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील विद्यापतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मढ गावात (Mau Village) रविवारी सकाळी एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. ही माहिती मिळताच ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनीही तत्काळ धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला.

मृतांमध्ये मनोज कुमार झा (वय, 35), त्यांची पत्नी सुंदरमणी (वय, 25), मुलगा शिवम (वय, 6), सत्यम कुमार (वय, 5) आणि आई सीता देवी (वय, 65) यांचा समावेश आहे. (हेही वाचा - Madhya Pradesh Shocker: बाळाच्या रडण्यामुळे संतापलेल्या अल्पवयीन आईने केलीने अडीच महिन्यांच्या मुलाची हत्या)

गावकऱ्यांनी सांगितले की, रविवारी सकाळी 7.30 ते 8.00 च्या दरम्यान बचत गटाच्या महिला मनोजच्या घरी पोहोचल्या आणि घर बंद पाहून पत्नीला फोन केला. खूप आवाज करूनही उत्तर न मिळाल्याने आजूबाजूच्या लोकांना फोन करून माहिती देण्यात आली. आवाज करून आजूबाजूच्या लोकांनीही दरवाजा ठोठावला. पण काहीच उत्तर न आल्याने लोकांनी खिडकीतून डोकावून पाहिले तर घरातील सर्वजण फासावर लटकलेले दिसले.

यानंतर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घरावर गर्दी केली. माहिती मिळताच विद्यापतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले. त्यानंतर दलसिंगसराय डीएसपीही गावात पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला. गावकऱ्यांनी सांगितले की, मनोज हा मऊ बाजारपेठेतील फूटपाथवर खैनीची विक्री करायचा. कमी पैशात तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह नीट करू शकत नव्हता. त्याच्याकडे शेतजमीनही नव्हती.

बचत गटाकडून घेतले होते कर्ज -

गावकऱ्यांमधील चर्चेनुसार मनोजच्या पत्नीने घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बचत गटाकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचा हप्ता भरण्यास ती असमर्थ होती. पैसे देण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता. याच दबावाखाली मनोज आणि त्याच्या कुटुंबीयांनी गळफास घेतला असावा, असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.