राफेल डील: अरुण जेटली यांनी मला शिवी दिली, प्रश्नाचे उत्तर नाही: राहुल गांधी (व्हिडिओ)
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राफेल विमान खरेदी (Rafale Deal) मुद्दयावरुन घमासान चर्चा सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही (Congress President Rahul Gandhi) शुक्रवारी लोकसभा सभागृहाबाहेर काहीसे आक्रमक रुपात पाहायला मिळाले. राफेल मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी राफेल मुद्द्यावरुन सरकारवर केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार करत राहुल यांनी जोरदार हल्ला चढवला. राफेल प्रकरणाची स्वतंत्र जेपीसी (JPC) मार्फत चौकशी करावी अशी मागणी करत गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही पलटवार केला. अरुण जेटली यांनी बरेच लांबलचक भाषण केले. मला शिवी दिली पण, माझ्या प्रश्नांचे उत्तर मात्र दिले नाही. दरम्यान, केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनी सभागृहाला देशाच्या सुरक्षेसंबंधी उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांचे उत्तर द्यावे अशी मागणीही राहुल यांनी या वेळी केली. दरम्यान, लोकसभा सभागृहात राफेलच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक आहेत. सत्ताधारी पक्षही कधी बचाव करत तर कधी आक्रमक होत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत.
राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनिल अंबानी यांनाच राफेलचे कंत्राट का देण्यात आले. संरक्षण मंत्रालयाला या कंत्राटावर काही आक्षेप होती. तर मग असे काय कारण होते की, या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत 36 राफेल विमान खरेदी करण्यात आली. सरकारला हे सभागृहात हे सांगावेच लागेल की 526 कोटी रुपयांच्या विमानांची किंमत थेट 1600 कोटी रुपयांवर पोहोचलीच कशी? असे सवाल उपस्थित करत, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, लोकसभेमध्ये चर्चेचे आव्हान देणारे पंतप्रधान मोदी यांनी संसदेत चर्चा सुरु असताना गुरुवारी पळ काढला. (हेही वाचा,फक्त 20 मनिटे आमनेसामने चर्चा करा; राफेल मुद्द्यावरुन राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना आव्हान )
दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वी अनेकदा पत्रकार परिषदांमधूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. राफेल विमान खरेदी व्यवहारात आम्ही केवळ सत्य जाणून घेऊ इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राफेल मुद्द्यावरुन पळ काढत आहेत असा आरोप करतानाच, मोदींनी माझ्यासोबत राफेल मुद्द्यावर आमनेसामने फक्त 20 मिनिटे चर्चा करावी असे थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले होते.