प्रियंका गांधी यांनी हेल्मेट न घालताच केला दुचाकीवरून प्रवास; पोलिसांनी ठोठावला 6100 रुपयांचा दंड (Video)
वाहतूक पोलिसांनी याबाबत त्यांना व गाडी चालणाऱ्या व्यक्तीस 6100 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
देशात वाहतुकीचे नवीन नियम लागू झाले आहेत. हे नियम जसे सामान्य नागरिकांसाठी आहेत, तसेच ते राजकारणी लोकांसाठीही आहेत याचा प्रत्यय नुकताच आला. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) या स्कूटीवरून हेल्मेट न घालताच प्रवास करत होत्या. वाहतूक पोलिसांनी याबाबत त्यांना व गाडी चालणाऱ्या व्यक्तीस 6100 रुपयांचा दंड (Challan) ठोठावला आहे. शनिवारी प्रियंका लखनऊमध्ये होत्या, त्यावेळी त्या माजी आईपीएस अधिकारी एसआर दारापुरी यांना भेटण्यास त्यांच्या घरी जात असताना हा प्रकार घडला. लखनऊ ट्रॅफिक पोलिसांनी हा दंड आकाराला आहे.
पहा व्हिडीओ -
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या हिंसक निषेधार्थ अटक झालेल्या, निवृत्त आयपीएस अधिकारी एसआर दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी शनिवारी पक्ष मुख्यालयातून रवाना झाल्या होत्या. परंतु त्यांना लोहिया चौकात थांबविण्यात आले. यामुळे प्रियंका गांधी कारमधून खाली उतरल्या आणि पायी निघाल्या. त्यावेळीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला, म्हणून त्या कॉंग्रेस नेते धीरज गुर्जर यांच्यासमवेत स्कूटीवरून दारापुरीच्या घरी निघाल्या असता, हेल्मेट न घातल्याने त्यांना दंड ठोठावला. (हेही वाचा: उत्तर प्रदेश पोलिसांनी माझा गळा दाबला आणि मला धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला; प्रियांका गांधी यांचा आरोप)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 2500 रुपये, हेल्मेटशिवाय वाहन चालविण्यामुले 500 रुपये, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यासाठी 300 रुपये, खराब नंबर प्लेट किंवा फॉल्ट नंबर प्लेटसाठी 300 रुपये आणि वाईट प्रकारे वाहन चालविण्याकरिता 2500 रुपये अशाप्रकारे हा दंड ठोठावला आहे. यादरम्यान पोलिसांनी आपला गळा दाबून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप प्रियंका यांनी पोलिसांवर केला आहे. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.