Lok Sabha Elections 2019: राहुल गांधी यांचा मोठा निर्णय; प्रियंका यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी
याचसोबत काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांच्याकडे उत्तर प्रदेश या संपूर्ण राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर एक मोठी खेळी खेळली आहे. या निवडणुकीच्या निर्णयाचा अंदाज घेत, त्यांनी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना पक्षात स्थान दिले आहे. प्रियंका गांधी यांची पक्षात सरचिटणीसपदी (Congress General Secretary) नियुक्ती करण्यात आली आहे, अशा प्रकारे आता प्रियंका गांधी यांचीही राजकारणात एंट्री झाली आहे. प्रियंका गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पदाची सूत्रे हातात घेतील.
कॉंग्रेसच्या प्रचारात प्रियंका गांधी यांनी नेहमीच हिरारीने भाग घेतला आहे. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी अनेक प्रचारसभा गाजवल्या आहेत. मात्र पक्षात त्यांना अधिकृतरित्या कोणते स्थान नव्हते. प्रियंका गांधी यांना पक्षात घेऊन या अशी मागणी कॉंग्रेसकार्यकर्ते अनेक दिवसांपासून करत होते. शेवटी आज प्रियंका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. याचसोबत काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांच्याकडे उत्तर प्रदेश या संपूर्ण राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश पश्चिमचे नेतृत्त्व ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. (हेही वाचा : अभिनेता कृष्णा अभिषेक देणार काँग्रेसला हात? उत्तर मुंबई मतदारसंघातून राजकारणाच्या मैदानात?)
येणारी निवडणूक कॉंग्रेससाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यात आता उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपा एकत्र आल्याने ही निवडणूक मोठी चुरशीची होणार यात काही शंका नाही. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने उचलले हे पाऊल नक्कीच त्यांना मदत करू शकते असे बोलले जात आहे. प्रियांका गांधी यांच्यावर माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची छबी असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस कायकर्त्यांमधील उत्साह दुणावला आहे.