दिवाळी तोंडावर आली असता सर्वसामान्यांना झटका; घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महागला
महागाईला तोंड देता देता जनतेला नाकी नऊ आले असताना, नोव्हेंबर महिन्यात विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ झाली आहे
दिवाळी तोंडावर आली असताना सर्वसामान्यांना फार मोठा झटका सरकारने दिला आहे. महागाईला तोंड देता देता जनतेला नाकी नऊ आले असताना, नोव्हेंबर महिन्यात विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही 59 रुपयांची वाढ झाली होती. त्याचबरोबर अनुदानित घरगुती सिलेंडरच्या दरात 2.94 पैशांची वाढ करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून गॅसचे नवे दर लागू होतील. गेल्या सहा महिन्यांतील गॅस दरांमध्ये झालेली हा सलग सातवी वाढ आहे.
इंडीयन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या अनुदानित सिलेंडरच्या किंमती 502.40/-रुपयांवरून 505.34/- रुपये इतकी झाली आहे. विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमती 60 रुपयांनी वाढून 880 रूपये इतकी झाली आहे.
यातील एकच दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, अनुदानित सिलेंडरवर देण्यात येणारी सूट सरकारने वाढवून ती 367.80 ऐवजी 433.66 इतकी केली आहे.