पश्चिम बंगाल: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 20 तास आधीच थंडावणार प्रचारतोफा
काल अमित शहा यांच्या लोकसभा निवडणूक प्रचारातील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पश्चिम बंगाल च्या निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
काल (14 मे) अमित शहा (Amit Shah) यांच्या लोकसभा निवडणूक (Loksabha Elections 2019) प्रचारातील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक आयोगाने (Election Commission) एक मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील सर्व रॅली आणि सभांवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. 16 मे पासून हा निर्णय लागू होणार असल्याचे निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. (पश्चिम बंगाल: अमित शाह यांच्या रोड शो मध्ये हिंसाचार; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज)
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पश्चिम बंगालच्या सर्व 9 लोकसभा मतदारसंघात उद्या रात्री 10 वाजेपर्यंत निवडणूक प्रचार करता येणार नाही. त्याचबरोबर पश्चिम बंगालचे गृह सचिव यांनाही पदावरुन हटवण्यात आले असून कोलकता पोलिस कमिश्नर यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर एडीजी सीआयडी राजीव कुमार यांना पदावरुन हटवण्यात आले आहे.
प्रचाराच्या तोफा 20 तास आधीच थंडावणार आहेत. तसेच हिंसाचारासंबंधी कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यासही निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्याचबरोबर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. (West Bengal: अमित शाह,भाजपच्या गुंडांकडूनच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार: तृणमूल काँग्रेस)
ANI ट्विट:
प्रचार करण्याची वेळ संपण्यापूर्वी निवडणूक आयोगाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सुमारे 20 तास आधी प्रचारावर बंदी घालण्याचा निर्णय प्रथमच घेतला आहे. 19 मे रोजी पश्चिम बंगाल मधील 9 जागांसाठी मतदान होणार आहे.