Telangana Election 2023 Results: ABVP मग TDP नंतर Congress मध्ये आले आणि आता तेलंगणात मुख्यमंत्री पदाचे दावेदार झालेले Revanth Reddy कोण? जाणून घ्या राजकीय प्रवास!
या विधानसभा निवडणुकीत रेवंत यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात निवडणूक लढवली.
तेलंगणा (Telangana) हे भारतामधील अस्तित्त्वामध्ये आलेलं सर्वात तरूण राज्य आहे. सध्या तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूकीची मतमोजणी (Telangana Election 2023 Results) सुरू आहे. राज्याच्या स्थापनेपासून केसीआर यांची सत्ता तेलंगणामध्ये होती आता तेलंगणात सत्ताबदल होण्याची चिन्हं आहे. कलांमध्ये तेलंगणात कॉंग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे तेलंगणामध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आज कल पाहूनच सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांच्यावर राहुल गांधींनी राज्याची जबाबदारी सोपावली होती आणि अपेक्षेनुसार त्यांनी कामगिरी देखील बजावली आहे. आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणूनही पाहिलं जात आहे. मग कॉंग्रेसला विजयाचा मार्ग दाखवणारा हा नेता कोण? याची तुम्हांलाही उत्सुकता असेल तर जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास!
रेवंत रेड्डी कोण?
सध्या रेवंत रेड्डी यांची जोरदार चर्चा आहे. त्यांच्याकडे सध्या तेलंगणा प्रदेश कॉंग्रेसची जबाबदारी आहे. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1967 रोजी नगरकुर्नूल च्या कोंडारेड्डी पल्ली मध्ये झाला. अनुमुला नरसिम्हा रेड्डी आणि अनुमुला रामचंद्रम्मा यांचे ते सुपुत्र असून वरिष्ठ कांग्रेस नेता आणि पूर्व केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री जयपाल रेड्डी यांचे जावई आहे. जयपाल रेड्डी यांची भाची अनुमुला गीता यांच्यासोबत ते 1992 साली विवाहबद्ध झाले. त्यांचे शिक्षण हैदराबाद मध्ये ए.वी. कॉलेज (ओस्मानिया विश्वविद्यालय) मध्ये झाले असून ते फाईन आर्ट्स मध्ये ग्रॅज्युएट आहेत. ते एक प्रिटिंग प्रेसही चालवतात. Telangana Election 2023 Result: कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विजय साजरा करताना Rahul Gandhi, Sonia Gandhi सह Revanth Reddy यांच्या पोस्टर वर केला दुग्धाभिषेक (Watch Video).
रेवंत रेड्डी यांचा जाणून घ्या राजकीय प्रवास
लग्नानंतर काँग्रेस खासदार रेवंत यांचा राजकीय प्रवास सुरू होतो, ज्याची कहाणीही रंजक आहे. विद्यार्थीदशेतच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या आरएसएसच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित होते. 2006 मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि मिडझिल मंडळातून जिल्हा परिषद प्रादेशिक समितीचे सदस्य म्हणून निवडून आले.
यानंतर, 2007 मध्ये, अपक्ष म्हणून आंध्र प्रदेश विधान परिषदेचे सदस्य झाले. या कार्यकाळात त्यांची तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी ओळख झाली आणि ते पक्षाचा एक भाग बनले. 2009 मध्ये, रेवंत यांनी टीडीपीच्या तिकिटावर आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली कोडंगल मतदारसंघातून निवडणूक लढवलेले रेवंत पाच वेळा काँग्रेसचे आमदार गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव करून पहिल्यांदाच आमदार झाले.
तेलंगणाच्या स्थापनेपूर्वी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, रेवंत पुन्हा एकदा कोडंगल मतदारसंघातून टीडीपीचे उमेदवार बनले. पुन्हा एकदा त्यांनी गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला. यानंतर टीडीपीने रेवंत यांना तेलंगणा विधानसभेचे नेते बनवले. 25 ऑक्टोबर 2017 मध्ये टीडीपीने रेवंत यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना पदावरून काढून टाकले. 31 ऑक्टोबर 2017 रोजी, रेवंत काँग्रेसचे सदस्य झाले.
20 सप्टेंबर 2018 रोजी, त्यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटी (TPCC) च्या तीन कार्यकारी अध्यक्षांपैकी एक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2018 च्या तेलंगणा विधानसभेत, रेवंत यांनी कोडंगल मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवली. यावेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या रेवंत यांना बीआरएसच्या पटनम नरेंद्र रेड्डी यांच्याकडून पहिला पराभव स्वीकारावा लागला.
विधानसभेतील पराभवानंतर 2019 मध्ये लोकसभा निवडणूकीत रेवंत यांनी आपलं नशीब आजमावलं. त्यावेळी कॉंग्रेस कडून निवडून आलेल्या 3 खासदारांपैकी रेवंत एक होते. मलकाजगिरी मतदारसंघातून टीआरएसच्या एम राजशेखर रेड्डी यांचा 10 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
काँग्रेसने रेवंत यांना जून 2021 मध्ये तेलंगणा राज्य युनिटचे अध्यक्ष केले. या विधानसभा निवडणुकीत रेवंत यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात निवडणूक लढवली. सिद्धीपेट जिल्ह्यातील गजवेल आणि कामारेड्डी विधानसभा जागेवर ही लढत आहे.