अनिल देसाई, अरविंद सावंत, भावना गवळी, विनायक राऊत हे आहे शिवसेना पक्षाचे केंद्रातील मंत्रीपदासाठी स्पर्धेतील चेहरे
मात्र, शिवसेना ही केंद्रात पाच मंत्रिपदासाठी आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे प्रत्यक्षात शिवसेनेच्या वाट्याला किती मंत्रीपदे येतात याबाबत उत्सुकता आहे. तरीही शिवसेनेच्या गोटात मात्र मंत्रिपदाची जोरदार चर्चा आहे.
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये केंद्रात भाजप आणि मित्रपक्षांना म्हणजेच NDA ला घवघवीत यश मिळाले. या यशानंतर केंद्रात नवे सरकार स्थापन करण्यासाठी वेगवान हालचाली सुरु आहेत. यात उत्सुकता आहे ती नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार याबाबत. मंत्रिपदासाठी भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरु आहेच. परंतु, आता केंद्रातील सत्तेचा वाटा मिळवा यासाठी NDA तील इतर घटक पक्षही आग्रही आहेत. महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेना हा पक्षही केंद्रातील मंत्रिपदासाठी आग्रही आहे. अद्याप मंत्रिमंडळ निवडीबाबत बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात असल्या तरी मंत्रिपदासाठी संभाव्य चेहऱ्यांची चर्चा मात्र जोरदार सुरु आहे. मंत्रिपदासाठी चर्चेत असलेले शिवसेनेचे हे काही संभाव्य चेहरे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भाजप केंद्रात शिवसेनेला 3 कॅबिनेट देण्यास इच्छुक असल्याचे समजते. मात्र, शिवसेना ही केंद्रात पाच मंत्रिपदासाठी आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे प्रत्यक्षात शिवसेनेच्या वाट्याला किती मंत्रीपदे येतात याबाबत उत्सुकता आहे. तरीही शिवसेनेच्या गोटात मात्र मंत्रिपदाची जोरदार चर्चा आहे.
अनिल देसाई
केंद्रातील शिवसेनेचा विषय जेव्हा चर्चेत येतो तेव्हा अनिल देसाई हे नाव सर्वात शेवटी परंतु तितक्याच प्रभावीपणे पुढे येते. अनिल देसाई हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जातात. प्रसारमाध्यमं, प्रसिद्धी यांपासून स्वत:ला दूर ठेवणारे पण शिवसेनेचे धोरण ठरविण्यात महत्त्वाचे असलेले नेतृत्व अशी देसाई यांची ओळख आहे. 2018 मध्ये ते शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार म्हणून नियुक्त झाले. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना केंद्रातील मंत्रीपदाची संधी मिळाली होती. परंतु, शिवसेनेचे भाजपसोबत बिनसलेल्या संबंधामुळे त्यांना मंत्रीपद स्वीकारण्यास निघेले असताना विमानतळावरुन परत यावे लागले होते.
अरविंद सावंत
कट्टर शिवसैनिक अशी मूळ ओळख असलेले अरविंद सावंत हेसुद्धा केंद्रातील मंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. शिवसेना उपनेते, प्रवक्ते, गटप्रमुख अशी बरिच पक्षांतर्गत पदे सावंत यांनी भूषवली आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत १,२८,००० च्या मताधिक्याने अरविंद सावंत निवडणुकीतील जायन्ट किलर म्हणून विजयी झाले. संसदेत सर्वाधिक उपस्थिती असलेले खासदार अशीही त्यांनी ओळख मिळवली. 2019 मध्ये पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा विजय संपादन केला. आता ते मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
भावना गवळी
भावना गवळी या शिवसेना पक्षाच्या विदर्भातील ताकदवान नेत्या मानल्या जातात. आतापर्यंत चार वेळा लोकसभेवर प्रतिनिधत्व केले आहे. तसेच, 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही दमदार विजय मिळवत त्या पाचव्यांदा लोकसभेवर निवडूण गेल्या आहेत. लोकसभेतील कामगिरी, पक्षातील ज्येष्ठत्व आणि जनमत याच्या आधारावर त्या शिवसेनेत मंत्रिपदाच्या दावेदार मानल्या जातात. त्यामुळे या वेळी मंत्रीपदासाठी त्यांचेही नाव चर्चेत आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election Results 2019: पार्थ पवार, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अनंत गिते, राजू शेट्टी यांची कुणी घेतली विकेट? पाहा कोण ठरले महाराष्ट्राचे जायंट किलर)
प्रा. संजय मंडलिक
कट्टर शिवसैनिक अशी ओळख बनविण्यात यशस्वी ठरलेले प्रा. संजय मंडलिक हे तसे शिवसेनेचे नवनिर्वाचीत खासदार. जिल्हा परिषद सदस्य आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. तसेच, कोल्हापूरमधील दिवंगत नेते सदाशिव मंडलिक यांचे पूत्र म्हणूनही त्यांना मानणारा मोठा वर्ग कोल्हापूरमध्ये आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडीक यांचा पराभव करुन ते खासदार झाले आहेत. विशेष म्हणजे या वेळी कोल्हापूरमधून शिवसेनेचे दोन्ही खासदार विजयी झाले आहेत. संजय मंडलिक हे कोल्हापूर तर, धैर्यशील माने हे हातकणंगले मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला अधिक बळकट करायचे तर, मंत्रिपद हवेच. त्यामुळे मंत्रिपदासाठी संजय मंडलिक यांची वर्णी लागण्यची शक्यता नाकारता येत नाही.
विनय राऊत
कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. परंतू, नारायण राणे यांच्या रुपात या बालेकिल्ल्याला मोठे आव्हान मिळाले होते. मात्र, हे आव्हान 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत मोडून काडत विनय राऊत विजयी झाले. नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांचा मताधिक्याने पराभव करत विनय राऊत विजयी झाल्याने ते एका अर्थाने जायंट किलरच ठरले आहेत. त्यामुळे राणे यांचे आव्हान थोपवत कोकणात आहे त्या पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर शिवसेना बळकट करण्यासाठी विनय राऊत यांना मंत्रिपद मिळू शकते अशी चर्चा आहे.