'आयुष्यभर काँग्रेस पक्षात नाही', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना शशी थरुर यांचे विधान

दरम्यान, त्यांच्या विधानामुळे उपस्थितांमध्ये वेगळाच अर्थ गेला. आपण काही भलतेच बोलून बसलो आहोत याची जाणीव होताच थरुर यांनी सावरत स्वत:चे विधान सुधारले.

Shashi Tharoor | (Photo Credits: Shashitharoor.in)

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी कौतुकोद्गार काढताना असे काही विधान केले की, ज्यातून अनेक अर्थ निघाले. अर्थात आपली नजरचूक ध्यानात येताच थरुर लगेच सावरलेसुद्धा. शशी थरुर हे लोकसभा निवडणुकीत (General Election) झालेल्या पराभवाबद्दल बोलत होते. ते म्हणाले काँग्रेस (Congress) पक्षाने सर्वसमावेशी भारताबद्दल आसलेले आपले विचार सोडता कामा नये. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी आयुष्यभरासाठी काँग्रेसमध्ये आलो नाही. दरम्यान, त्यांच्या विधानामुळे उपस्थितांमध्ये वेगळाच अर्थ गेला. आपण काही भलतेच बोलून बसलो आहोत याची जाणीव होताच थरुर यांनी सावरत स्वत:चे विधान सुधारले. दरम्यान, या वेळी थरुर यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यावर स्तुतीसुमनेही उधळली.

काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात थरुर बोलत होते. शशी थरुर हे तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. थरुर यांनी आपल्या भाषणात हाही दावा केला की, लोकसभआ निवडणूक निकालावर नजर टाकता देशातील 60% मतदार हे भाजपा (BJP) विचारधारेशी सहमत नाहीत. पुढे ते म्हणाले, 'मला वाटते की गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत एकूण मतदार संख्येच्या तुलनेत भाजपला 37% मतं मिळाली. यातही अनेक लोक असे आहेत जे भारताला बहुसंख्याकवादी देश होताना पाहू इच्छित नाहीत.' दरम्यान, थरुर यांनी आपल्या मुद्द्यावर जोर देत म्हटले की, 'काँग्रेस हा सर्वसमावेशी भारताचा पुरस्कार करतो, म्हणूनच तो 'भाजप'पेक्षा वेगळा ठरतो. काँग्रेस पक्षाने या मुद्द्यावर अडून राहिले पाहिजे. जे काँग्रेस केली 130 वर्षे करत आली आहे. (हेही वाचा, मराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर? ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ)

पुढे बोलताना थरुर म्हणाले की, मी राजकीय करिअर करण्यासाठी काँग्रेस पक्षात आलो नाही. मी काँग्रेसमध्ये आलो कारण, काँग्रेसमध्ये सर्वसमावेश विचार सामावून घेण्याची शक्ती आहे. देशाला एकत्र आणि सर्वसमावेशी ठेवणे या मुद्द्याला एक जागा अथवा काही टक्के मतं याच्याशी जोडता येऊ शकत नाही. शेवटी आपला विचार काय आहे हाच मुद्दा महत्त्वाचा, असे थरुर म्हणाले.